राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ठाणे पालिकेमध्ये मात्र कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी शिवसेनेला आव्हान दिलं असून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. महाविकासआघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची नाही, शिवसेनेला आघाडी करण्यात स्वारस्य नसेल तर आम्हीदेखील स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत असं नजीब मुल्ला म्हणाले आहेत. हिंमत असेल तर शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करुन दाखवावी असं आव्हानच त्यांनी दिलं.

दिवा येथील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

लोकसत्ता विश्लेषण : ठाण्यातील आघाडीत बिघाडीच अधिक!

नजीब मुल्ला यांनी शिवसेनेला आव्हान दिलं असून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा दिला असल्याबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड म्हणाले की, “गटनेते अनावधानेने बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने असून आघाडीच्या बाजूनेच लढेल. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असतं. ठाण्याचा संपर्कमंत्री जितेंद्र आव्हाड असून आघाडी तुटेल असं आमच्याकडून काही केलं जाणार नाही”.

“शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असं माझं मत आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे, त्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं…; आव्हाडांनी करुन दिली आठवण

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६८ नगरसेवक असून या पक्षाची एकहाती सत्ता आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ तर भाजपचे २३ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या ३४ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवक हे राबोडी आणि लोकमान्यनगर पट्ट्यातून निवडून आले आहे. या विजयातही नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या दोन स्थानिक नेत्यांचा वाटा मोठा राहिला आहे. राष्ट्रवादीचे उर्वरित २६ नगरसेवक हे कळवा-मुंब्रा भागातून निवडून आले आहेत यावरून या पक्षाचा जीव नेमका कुठे आहे हे लक्षात येते. कळव्यातील १६ जागांपैकी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९, शिवसेनेचे ६ तसेच १ अपक्ष नगरसेवक निवडून आला. या १६ पैकी किमान १२ जागांवर विजय मिळेल अशी आव्हाडांना खात्री होती, मात्र शिवसेनेने हे गणित त्यावेळी चुकविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सत्ता, नगरविकाससारखे तगडे खाते आणि महापालिकेवरील पकड लक्षात घेऊन श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोघांनी यंदा कळव्यात राष्ट्रवादीला कडवे आव्हान द्यायची रणनीती आखली आहे. कळव्यातील विकासकामांवर शिवसेनेची मोहर कशी उमटेल यासाठी हे दोन नेते प्रयत्न करताना दिसतात.