जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पायाच्या नखाचीही सर ज्या व्यक्तीला नाही अशा बागेश्वरला काही लोक महाराज म्हणतात. त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतो आहे. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे बागेश्वर ? तरीही काही लोक त्याला मोठं करत आहेत. तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं किर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे ते १०० टक्के महाराष्ट्र द्रोही आहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?
महाराष्ट्राच्या भूमीवर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य त्या बागेश्वरने केलं आहे ते मन दुखावणारं आहे. महाराष्ट्राच्या मातीचा, संस्कृतीचा अपमान करणारं ते वक्तव्य आहे.मी त्या बागेश्वरला बाबा म्हणतच नाही. या बागेश्वरच्या संपूर्ण कुटुंबाची अक्कल ही तुकाराम महाराजांच्या पायाच्या नखाइतकीही नाही. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे हा बागेश्वर? मतं पडणार नाहीत असं वाटत असतं तेव्हा काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठं करायची.मतं मिळत नाहीत हे दिसू लागलं की असं काहीतरी थोतांड करायचं. तुकाराम महाराजांविषयी बोलणाऱ्या बागेश्वरला सन्मान मिळणार असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण ज्याने तुकाराम महाराजांचा अपमान केला त्याने महाराष्ट्राचा अपमान केला. अशा माणसाचा कार्यक्रम घेणारे लोक महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्र द्वेषी आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाला संमती दिली जाऊ नये यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्र लिहिलं आहे. या महाराजांच्या कार्यक्रमाला संमती देणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणं आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे नाना पटोलेंनी पत्रात?
“महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये.”
अमोल मिटकरींकडून विरोध
याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता पटोले म्हणाले की, “बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वतःच अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही.” तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, “आम्ही विधान परिषदेत मागणी केली होती की, या बागेश्वर बाबावर कडक कारवाई केली जावी. अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या या बाबाला राज्यात कार्यक्रमासाठी परवानगी मिळत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो.” असं मिटकरींनी म्हटलं आहे.