मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद टोकापर्यंत गेल्याचं मध्यंतरी पाहायला मिळालं. दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करतात. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मनोज जरांगे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत”, असा खोचक टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. संपूर्ण हिंदुस्तान मनोज जरांगे यांना घाबरला आहे. काय सांगतायेत? ते काही बडबड करत आहेत. त्यांची हुशारी किती? ते नाशिकमध्ये येऊन बोलत आहेत की, येथे ओबीसीची जागा आहे. मग ओपन उमेदवाराने का लढावं? बीडमध्ये जातात तेथे म्हणतात, ही ओपनची जागा आहे. येथे ओबीसीने का लढावं? त्यांना हेदेखील कळत नाही की, विधानसभेत आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही. आता आम्ही येवला लढतो, तेथून निवडून येतो. ज्यांना एवढंही समजत नाही, त्यांना आपण काय सांगणार? या पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभा होत आहेत. मनोज जरांगे सध्या गिणतीमध्ये नाहीत”, अशी टीका छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.

हेही वाचा : “ईडीची गती वाढवा…”, फडणवीस यांचं कौतुक करताना सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उज्जवल निकम यांना बक्षीस दिले असेल…

प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “तो भाजपाचा निर्णय आहे. कामाचे मूल्यमापन किंवा काहीतरी विचार केला असेल. पण उज्जवल निकम हे उत्कृष्ट वकील आहेत. दहशतवाद्यांच्या विरोधात अतिशय मेहनतीने कोर्टात उज्जवल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना धोका निर्माण झाला होता, पण कशाचीही परवा न करता त्यांनी देशसेवा केली. त्यामुळे त्यांना त्याचे बक्षीस दिले गेले असेल”, असे छगन भुजबळ म्हणाले.