राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले अनेक नेते पक्ष सोडून भाजपा आणि शिवसेनेत जात आहेत. उदयनराजे भोसले हेदेखील भाजपात येणार अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनीही दिली होती. दरम्यान आज राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु झाली आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जाऊ नये यासाठी अमोल कोल्हे त्यांची मनधरणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान रविवारीच भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “भाजपाची वाटचाल सध्या जोरात सुरु आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, भाजपाच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत कंपन्या बंद पडत आहेत. गेल्या चार-पाच वर्षात साताऱ्यात विकास कामे झाली. परंतु सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो. सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तेथे जाणेही योग्य नाही.” असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं. त्यानंतर आता उदयनराजे यांनी पक्ष सोडून भाजपात जाऊ नये म्हणून अमोल कोल्हे हे त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना भेटायला गेले असल्याचं समजतं आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत असल्याचं समजतं आहे. उदयनराजे भोसले यांच्या घरी आज गणरायाचं आगमन झालं. त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या घरी हजेरी लावली. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा होते आहे. या चर्चेत नेमकं काय घडलं ते समजू शकलेलं नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे हे त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे भोसले काय निर्णय घेणार यावर अवलंबून आहे. मात्र हे दोन नेते भेटल्याने साताऱ्यात आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.