सांगली : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी झालेल्या हल्ल्याचा सांगलीत बार असोसिएशनने निषेध केला. तसेच या निषेधार्थ मंगळवारी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्व न्यायालयीन कामकाज ठप्प झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने मनुवादी प्रवृत्तीचा धिक्कार करत सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने न्या. भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. याचे तीव्र पडसाद आज सांगलीत उमटले. सांगली बार असोसिएशनची तातडीची बैठक अध्यक्ष अशोक वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत न्या. गवई यांच्यावर बूट फेक करणाऱ्या राकेश किशोर यांचा तीव्र शब्दांत निषेध करत या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसा ठराव बार असोसिएशनच्या सभेत करण्यात आला.

या बैठकीमध्ये डी. टी. पवार, प्रताप हारूगडे, जे. व्ही. पाटील, सी. डी. माने, विलास हिरगुडे, सुनीता मोहिते, फारूक कोतवाल आदी वकिलांनी या घटनेचा निषेध केला. कारवाईच्या मागणीचे निवेदन उप जिल्हाधिकारी स्नेहल कणिचे यांना देण्यात आले. बैठकीनंतर आजच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला. यामुळे दिवसभर न्यायालयीन कामकाज होऊ शकले नाही. यामध्ये दिवाणी, फौजदारी, सहकार, ग्राहक न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला.

दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेक करणाऱ्या सनातनी मनुवादी प्रवृत्तीचा आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन हे सांगलीतील स्टेशन रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.

पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदर घटनेचा निषेध करत सदर सनातनी मनुवादी वृत्तीच्या माणसावर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी तानाजी गडदे, आयुब बारगीर, डॉ. शुभम जाधव, महालिंग हेगडे, शीतल खाडे, विद्या कांबळे, संगीता जाधव, सुरेखा सातपुते, छाया पांढरे, प्रणवी पाटील, तेजश्री अवघडे, अकबर शेख, फिरोज मुल्ला, विनायक हेगडे, सरफराज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.