राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असून राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशनात राज्यातील कापूस, सोयाबीनचे दर, दूधाच्या दरासह आदी महत्वाच्या प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. असे असतानाच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. “राम शिंदे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी एमआयडीसीचे कागदपत्र दाखवावे”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी आणली नाही, याचं अपयशं हे रोहित पवारांचं आहे, अशी टीका होत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “जेव्हा मी एमआयडीसीबाबत बोललो तेव्हा मी पुराव्यानीशी बोललो आहे. भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर सर्व कागदपत्र समोर आणावेत”, असं थेट आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “भष्ट्राचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडूनच…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

रोहित पवार पुढे म्हणाले, “आता कुठेतरी ड्रोन सर्व्हे सुरु झाला आहे. मग दोन एमआयडीसी होणार असतील तर होऊ द्या ना? एक फॉरेस्टची एमआयडीसी असेल तर त्या ठिकाणी झाडे लावता येतील. आम्ही जी एमआयडीसी पुढे आणत आहोत, त्यामध्ये आपण एमआयडीसीमधील इंडस्ट्री आणता येतील. एका बाजुला झाडे लावण्यामुळे पर्यावरणाचा फायदा होईल. दुसरीकडे आम्ही जी एमआयडीसी आणतो आहोत, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल. मग यामध्ये दुजाभाव का करत आहात? दोन्हींही होऊ द्या, अडचण काय आहे?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांवर टीका

अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर आज एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख करत त्यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांवर टीका केली आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “जेव्हा तुम्ही ३० ते ३५ वर्ष सांभाळलेला विचार सोडून भारतीय जतना पार्टीबरोबर जाता. मात्र, ज्या लोकांनी तुमच्यावर वेगवेगळ्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, त्यांच्याबरोबर तुम्ही जाता. मग त्याला आपण स्वार्थ म्हणू शकतो. अशा प्रकारचं स्वार्थी राजकारण लोकांना कधीही पटत नाही. हे लोकांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं. आम्ही कोणत्याही योजनेसाठी काही बोललो नाहीत. जे काही बोलत आहेत ते सर्वसामान्य लोक बोलत आहेत. लोकांना ज्या गोष्टी पटलेल्या नाहीत ते लोक बोलत आहेत. अजित पवारांनी केलेल्या विकासाच्या कामांबाबत कधीही बोललो नाहीत. आम्ही फक्त विचारांबाबत बोलत आहोत”, अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली.