Uttam Jankar On Mahayuti Government : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला आहे. मात्र, अद्यापही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. तसेच यापुढे ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेटवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी एक विधान केलं आहे, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा रंगली आहे. “पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील सरकार १००० टक्के पडणार म्हणजे पडणार”, असा मोठा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

आमदार उत्तम जानकर काय म्हणाले?

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला आव्हान दिलंय की तुम्ही जर ईव्हीएम हॅक करुन दाखवलं तर ते त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला भेट देण्यास तयार आहेत. यावर प्रतिक्रिया काय? असा प्रश्न उत्तम जानकर यांना विचारला. यावर बोलताना जानकर म्हणाले, “गेल्या एक महिन्यांपासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करत आहे. जे माझ्या तालुक्यात झालं, तेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेलं आहे. मी बारामतीचा अभ्यास केला, त्या ठिकाणी अजित पवार २० हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत. जयकुमार गोरे हे १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत”, असा दावा उत्तम जानकर यांनी केला. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंच्या जागी तुम्हाला मंत्रिपद मिळेल का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “मला…”

“आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रॉपर्टी भेट देणं किंवा नाही देणं यासाठी माझा लढा नाही. या सरकारला आणि निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे की, एकतर सर्व निवडणुका घ्या. पण तुम्ही त्या घेणार नाहीत. पण बारामती आणि मी देखील राजीनामा द्यायला तयार आहे, माझ्या बरोबर अजित पवारांचाही राजीनामा घ्या. मग मला पाहायचं आहे की अजित पवार १० हजार मतांनी तरी निवडून येतात का? मी हे आव्हान देत आहे. अजित पवार आणि माझी पोटनिवडणूक एकाच वेळी व्हावी. मग देवेंद्र फडणवीस असो किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर, मी त्यांना आज आव्हान देतो राज्यातील नाही फक्त या दोन्ही (बारामती आणि माळशिरस) मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेटवर घ्या. तुम्ही ही निवडणूक घेत नाहीत तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही”, असं आव्हान उत्तम जानकर यांनी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राज्यातील महायुतीचं सरकार पडणार’

“मी सरकारला आठ दिवसांपूर्वी चार महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. आता त्यामधून चार दिवस कमी झालेले आहेत. आता ३ महिने २६ दिवस बाकी राहिले आहेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, राज्यातील हे महायुतीचं सरकार १००० टक्के जाणार म्हणजे जाणार. ज्यावेळी सर्वांसमोर मी पुरावे सादर करेन तेव्हा राज्य आणि देश गडबडून जाईल. मात्र, त्यानंतर या सत्ताधाऱ्यांना कोणताही पर्याय राहणार नाही. त्यामुळे मी वारंवार सांगतोय की माझ्या मतदारसंघाची तरी पोटनिवडणूक तुम्ही बॅलेटवर घ्या”, असं आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.