scorecardresearch

“हे पुण्यात घडतंय याचा अर्थ…”, शरद पवारांचं सूचक विधान; कसबा पोटनिवडणूक निकालांचा केला उल्लेख!

शरद पवार म्हणतात, “आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे…!”

sharad pawar on kasba bypoll results
शरद पवार व भाजपा (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आणि महाराष्ट्रातही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपानं जागा राखली असताना दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत. मात्र, विरोधकांकडून कसब्यातील विजयावरून सत्ताधारी भाजपाला घेरलं जात आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपाचा बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

कसबा-चिंचवडमध्ये काय घडलं?

चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि राष्ट्रवादीचे बंडखोर राहुल कलाटे यांनाही भरघोस मतं मिळाली आहेत. या दोघांच्या मतांची बेरीज अश्विनी जगताप यांच्यापेक्षाही जास्त असल्याचा दावा करत विरोधकांकडून हा भाजपाचा नैतिक पराभवच असल्याची टीका केली जात आहे.

दुसरीकडे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा झेंडा फडकावत मविआला विजय मिळवून दिला. भाजपाच्या हेमंत रासनेंना ११ हजारहून जास्त मतांनी पराभव करत रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला. कधीकाळी गिरीश बापटांच्या रुपाने कसबा हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ मानला जायचा. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक लागली. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्यामुळे भाजपाला नाराजीचा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

“निवडणूक आयोग राजकीय मालकांसाठी काँट्रॅक्ट किलर पद्धतीने…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल!

“लोक मतदान करताना याचा विचार करतील”

दरम्यान, या निवडणुकीवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, प. बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा नाही. कर्नाटकात आमदार फोडून भाजपानं सत्ता मिळवली. आगामी काळात मतदान करताना लोक याचा नक्कीच विचार करतील”, असं शरद पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

“संजय राऊतांना याचे परिणाम भोगावे लागतील”, मंत्री अब्दुल सत्तारांचा इशारा; म्हणाले, “या सगळ्याचं मूळ कारण…”

“हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय”, असा इशारा शरद पवारांनी यावेळी बोलताना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 10:27 IST
ताज्या बातम्या