लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपाचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना, नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

‘महाराष्ट्र बंद’ मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगतानाच सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.