Pune Nilesh Ghaiwal Gaja Marne Crime News : कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याने त्याच्यावरुन राजकारण रंगतं आहे. महाराष्ट्रात या घायवळला कुणी बनावट पासपोर्ट बनवून दिला? त्याला कुणी पाठिंबा दिला? या सगळ्या प्रश्नांवरुन सध्या गदारोळ सुरु आहे. दरम्यान गुंड निलेश घायवळ कोण? गजा मारणे याची आणि त्याची मैत्री कशी झाली? तसंच दोघांमध्ये हाडवैर का निर्माण झालं? आपण जाणून घेऊ.

कोण आहे निलेश घायवळ?

निलेश घायवळ घायवळ टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर पहिला गुन्हा हा २६ वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. १९९ मध्ये पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा हा खंडणीचा दाखल झाला होता. त्यानंतर १९९९, २०००, आणि २००१ मध्ये घायवळ याच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, दंगल करणे, खून आणि खुनाचा कट रचणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळ याच्यावर एकूण १४ गुन्हे दाखल असून पुणे जिल्ह्यात एकूण २४ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर धाराशिव बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी अपहरण आणि इतर अनेक गुन्हे हे निलेश घायवळ याच्यावर दाखल आहेत.

निलेश घायवळ गजा मारणेशी कसा जोडला गेला?

निलेशनं मास्टर्स इन कॉमर्स पूर्ण केलं. त्यानंतर त्याच्यापुढे नोकरीचा पर्याय होता. पण, त्यानं ते न निवडता गजा मारणेला निवडलं. त्याच्या गँगमध्ये तो गुंड म्हणून काम करुन लागला. हप्ते वसूल करणं, लोकांना धमकावणं, जमिनींची प्रकरणं सांभाळणं, निवडणुकांमध्ये मागून सगळं मॅनेजमेंट सांभाळणं, पुण्यातल्या इतर गुंडांवर वचक ठेवणं अशी सगळी कामं निलेश करु लागला. त्यामुळे गजा मारणेच्या तो जवळ गेला आणि इथं त्याला पुण्यातला एक भाग सांभाळायला मिळाला. त्यामुळे गजा मारणे आणि निलेश यांच्यात चांगली मैत्री झाली होती. मात्र गुन्हेगारी विश्वात प्रचंड महत्त्वाकांक्षा असलेल्या निलेश घायवळने मारणे गँगमध्येच ‘आपली’ माणसं तयार केली. ज्यामुळे गजा मारणे आणि त्याच्यात वादाची ठिणगी पडली.

निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यात बिनसल्यानंतर सुरु झाले हल्ले

निलेश घायवळ पहिल्यांदा हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह २६ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. पण या आणि इतर गुन्ह्यांत देखील घायवळला जामीन मिळाला आणि अखेर तुरुंगातून बाहेर आला. न्यूज १८ ने हे वृत्त दिलं आहे.

आर्थिक व्यवहारांतूनही मारणे आणि घायवळ यांच्यात वितुष्ट

निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातलं वैर हे आर्थिक व्यवहारांतूनही शिगेला पोहचलं. सूड घ्यायचा म्हणून गजा मारणेनं दोनदा घायवळवर जिवघेणा हल्ला केला पण थोडक्यात निलेश घायवळ यातून वाचला. पुण्यातल्या गल्ल्यांमध्ये आणि भर रस्त्यात गँगवॉर घडत होतं. सचिन कुंडलेची दत्तवाडीत झालेली हत्या ही भयंकर ठरली होती.

निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पळाला

निलेश घायवळ हा अगदी उच्चशिक्षित आहे. पुण्यातील अंडरवर्ल्ड विश्वात त्याने त्याची दहशत पसरवली आणि दबदबा तयार केला. नाव पोलिसांच्या लिस्टमध्ये सर्वात वर आलं… एका प्रकरणात पोलिसांनी त्याला शोधायला सुरुवात केली, पण कळलं की तो तर फरार झालाय. तो चक्क इंग्लंडला सेटल झाला आहे आणि तेही बायको पोरांसह. अशी माहिती समोर आली. ज्यानंतर निलेश घायवळ प्रकरणाला राजकीय वळणही लागलं. मागील सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) पोलिसांनी घायवळच्या घरात छापा टाकून काडतुसं जप्त केली. प्रॉपर्टीचे पेपर्सही सापडले. एवढंच काय त्याचं बीड कनेक्शनही समोर आलं.

निलेश घायवळबाबत निर्माण झालेले प्रश्न कुठले?

१) पोलिसांच्या नेहमी नजरेत असणाऱ्या आणि मकोका लावलेल्या निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला?

२) कुठल्या अधिकाऱ्याच्या कृपेनं निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पोहचला?

३) निवडणुकांच्या दरम्यान निलेश घायवळने कुणाची कामं केली होती?

४) निलेश घायवळचं बीड कनेक्शन नक्की काय?

५) निलेश घायवळला भारतात परत आणता येईल का?

हे प्रमुख प्रश्न निलेश घायवळबाबत उपस्थित होत आहेत.

राजकारण कसं रंगलं आहे?

निलेश घायवळ पळून गेल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणावरुन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले आहेत. योगेश कदम यांनीच निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप अनिल परब यांनी केला असून त्यांना पदावरुन हटवा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी हे आरोप केले.