“९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही संताप व्यक्त केला आहे. आज अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध करत सोदाहरण स्पष्टीकरण दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पंजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपला आजोबा- पंजोबा अडाणी होता बिचारा. आता आपण सुशिक्षित झालो, त्यानेच आपल्याला शिकवलं. रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केलं. तो आपला आजोबा, पंजाबो, खापरपंजोबा स्वतःला कुणबी समजायचे. एखादा कोणाकडे मुलगी बघयाला गेले आणि कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा पंधरा एकर कुणबी करतो.”

हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला नारायण राणेंचा विरोध, “९६ कुळी मराठ्यांना सरसकट कुणबी…”

“पण नंतर कुणबीला सुधारित शब्द आला शेती. आपला आजा चपलेला पायताण म्हणायचा, पण आता पायताणाला चप्पल म्हणतात मग पायताण घालायची बंद करायची का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता नवीन शब्द आला रेस्टॉरंट, मग चहा प्यायचा बंद करायचा का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात मग झोपायचं बंद करायचं का? सुधारित शब्दाला अडचण काय? तुम्हाला घ्यायचं (कुणबी प्रमाणपत्र) तर घ्या नाहीतर घेऊ नका. तुम्हाला जबरदस्ती केली का कोणी? पण गोरगरिबांच्या लेकरांना घेऊ द्या. त्यांच्या आयुष्याची माती करू नका. त्यांना भविष्य घडवायचं आहे. मराठ्यांच्या ते हक्काचं आहे, त्यांना मिळू द्या. तुम्ही आमचे आदर्श लोक आहोत, महाराष्ट्रातील सगळे वरिष्ठ मराठे तुम्ही आदर्श आहात, तुम्ही नका विरोध करू, त्यांचं कल्याण होऊ द्या”, असं मनोज जरांगे पाटील नारायण राणे यांचं नाव न घेता म्हणाले.

हेही वाचा >> नारायण राणे यांच्या ‘मराठा अस्मिते’ला इतिहासाचा निर्विवाद आधार आहे?

“७५ वर्षांत जे पक्ष झाले, नेते झाले त्यांना मोठं करण्याकरता मराठा समाजाने खस्ता खालल्या आहेत. तुम्हाला उपकार फेडायचे नसतील तर नका फेडू पण, आरक्षणाला विरोध करू नका. ते मिळवण्याकरता मराठे खंबीर आहेत”, असा इशाराही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

“मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत. ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, असं नारायण राणे म्हणाले.