सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व शिरीष पारकर यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयाने शनिवारी पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावले. एका खटल्याच्या सुनावणीसाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे तारखेला हजर राहिले नसल्याने शिराळा न्यायालयाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
रेल्वे कर्मचारी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी १४ वर्षापुर्वी मनसेचे आंदोलन झाले होते. या आंदोलन प्रकरणी मनसेचे नेते राज ठाकरे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे व मनसेचे नेते शिरीष पारकर यांचा देखील समावेश होता.
हेही वाचा >>> सांगली : राज ठाकरेंचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात नामंजूर
सदर गुन्ह्याचा खटला हा शिराळा न्यायालयामध्ये गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान खटल्यासाठी सुनावणीला राज ठाकरे हे वारंवार गैरहजर राहत असल्याने चार महिन्यांपूर्वी शाळा न्यायालयाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आले होते,मात्र इस्लामपूर सत्र न्यायालया मधून वॉरंट रद्द करून घेण्यात आले होते, त्यानंतर राज ठाकरे यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्याची मुभा देण्यात आली होती.
दरम्यान शनिवारी शिराळा न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी पार पडली असता, ठाकरे यांचे वकील रवी पाटील यांच्याकडून राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि शिरीष पारकर बाहेरगावी असल्याने त्यांना गैरहजर राहण्यासाठी मुभा देण्यात यावी,असा अर्ज दाखल केला.मात्र न्यायालयाने सदरचा अर्ज नामंजूर करत ठाकरे आणि पारकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.