राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. मोजके नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय नेत्यांसह लोकांमध्येही याबाबत संभ्रम आहे. पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं मान्य केलं आहे. तसेच दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पक्षात कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं असताना, निवडणूक आयोगानं ६ ऑक्टोबर रोजी पक्षफुटीवर सुनावणी ठेवली आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांच्या या विधानावर अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “पक्षात फूट नसल्याचं सांगूनही सुनावणी लावली”, जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

“पक्षात फूट पडली नाही, आम्ही केवळ अध्यक्ष बदलला आहे”, असं विधान छगन भुजबळांनी केलं. जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. आम्हीही म्हणतो आमच्या पक्षात फूट पडली नाही. आम्ही फक्त अध्यक्ष बदलले आहेत. काही लोक बदलले आहेत. वेगवेगळे पदाधिकारी बदलले आहेत. जसे की अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही आधीच कळवलं आहे.”

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “शरद पवारांनी निवडणूक आयोगाला जे उत्तर दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. मला कुणीही विरोध केला नाही. कुणीही माझ्या धोरणांना जाहीरपणे विरोध केला नाही. कुणीही वेगळा सूर काढला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली. सगळेच मुद्दे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मांडले होते.”

हेही वाचा- “हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलाही वाद नसल्यामुळे तुमच्याकडे जो पत्रव्यवहार झाला आहे. त्यासंदर्भात आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, आम्हाला वेळ द्या, असं शरद पवारांनी सांगितलं होतं. पण निवडणूक आयोगाने वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे, हे अचानक ठरवलं आणि सुनावणीसाठी ६ ऑक्टोबरला बोलावलं. निवडणूक आयोगाने शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देणं आवश्यक होतं,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.