जालना : ओबीसी आंदोलनातील नेते नवनाथ वाघमारे यांचे उभे चारचाकी वाहन पेटविल्याची घटना रविवारी रात्री घडली. जालना शहरातील नीलमनगर भागातील त्यांच्या निवासस्थानासमोर ही गाडी उभी होती. वाहनामधून धूर निघत असल्याचे आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. जुना जालना पोलिसांनी घटनास्थळी येऊन या संदर्भात चौकशी केली. याप्रकरणी आसपासचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहण्यात आले.
नवनाथ वाघमारे यांनी या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना सांगितले, की शनिवारपासून वाहन घरासमोर उभे होते. पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहन जाळले, तरी आपण ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठविणे थांबविणार नाही.
वाहन पेटवून देण्यामागे मनोज जरांगे समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करून वाघमारे म्हणाले, ‘आपण ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत असताना कोणतेही चुकीचे कृत्य करीत नाही. गाडी पेटवून देण्याचे कृत्य योग्य नाही. कोणी असे कृत्य केले असले तरी आम्ही त्या मार्गाने जाणार नाही, असेही ते म्हणाले. या अनुषंगाने त्यांनी शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
हिंगोलीत ॲड. सदावर्तेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
हिंगोली : ॲड. गुणरत्न सदावर्ते हे औंढा नागनाथमार्गे हिंगोलीकडे येत असताना त्यांच्या ताफ्यासमोर रविवारी रात्री नऊच्या सुमारास येहळेगाव सोळंके येथील मराठा समाजाच्या आंदोलकांनी सदावर्तेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, औंढा नागनाथ पोलिसांनी आंदोलकांना वेळीच रोखल्याने सदावर्तेंचा ताफा पुढे निघून गेला. विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार बैठकीत ॲड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध का आहे, यामागची भूमिका विशद करताना त्यांनी मनोज जरांगे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात टीकाटिप्पणी केली.
गुणरत्न सदावर्ते येणार असल्याची माहिती येहळेगाव येथील मराठा आंदोलकांना मिळाली होती. रविवारी रात्री उशिरा त्यांचा ताफा औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे जात असताना येहळेगाव बस थांब्याजवळ आंदोलक जमा झाले होते. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी त्या भागात बंदोबस्त तैनात केला. परिणामी कोणतीही अप्रिय घटना न घडता सदावर्ते यांचा ताफा हिंगोलीकडे रवाना झाला.