ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली होती. दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आज (मंगळवारी) मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसामुळे अनेकांनी आज घरीच थांबण्यास पसंती दिली. दरम्यान हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दक्षिण भारताला झोडपणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळ सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यत ते सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये सैन्यदल आणि नौदलाने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली असली, तरी महाविद्यालयांत होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजीत वेळेनुसारच होणार असल्याचे रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाकडून कळवण्यात आले. अभियांत्रिकी, विधी आणिअन्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

‘ओखी’ चक्रीवादळामुळे ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच (भरतीच्या पाण्याची पातळी) लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

LIVE UPDATES:

* पाहा व्हिडिओ: ओखी वादळामुळे मुंबईत पावसाची बॅटिंग

* ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरतमध्येही सतर्कतेचा इशारा. एनडीआरएफचे पथक सज्ज.

* पावसाची हजेरी आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहनचालक त्रस्त

* मुंबईत डिसेंबरमध्ये गेल्या १० वर्षातील सर्वाधिक पाऊस. यंदा डिसेंबरमध्ये २२ मिमी. पावसाची नोंद.

* ओखी वादळामुळे माळशेज घाटात झाड कोसळले, मार्गावरील वाहतूक बंद

* ओखी वादळाची सद्य परिस्थिती

* सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या कालावधीत सांताक्रूझमध्ये २२ मिमी तर कुलाबामध्ये २३ मिमी पावसाची नोंद

* नाशिक, धुळे, साक्री येथे पावसाच्या सरी

* पावसामुळे महामार्गांवर कोंडी, ईस्टर्न फ्री वे, वेस्टन एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड येथे वाहतूक कोंडी.

* आज दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी समुद्रात भरती, ४.३५ मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  ओखी वादळामुळे मुंबई ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची प्रवासी जलवाहतुक बंद

* अंधेरीत पावसाची हजेरी