Marathwada Heavy Rain : महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलेलं असून एनडीआरएफची टीम नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मदतकार्य करत आहे.
दरम्यान, अशा परिस्थितीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत असल्याचं दिसून आलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे बचावकार्य करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओत काय?
मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने परंडा तालुक्यातील वडनेर गावातील एका कुटुंबीयाच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे ते कुटुंबीय घराच्या छतावर अडकून पडलं होतं. मात्र, त्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धावून जात ते स्वत: त्यांच्या बचावासाठी पुराच्या पाण्यात उतरून मदत केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. त्यांच्या या कार्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
आज वडनेर ता.परंडा येथील नागरिकांचे प्राण वाचविल्याचा मनस्वी आनंद..!#वडनेर #परंडा #नुकसान
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 22, 2025
#dharashiv #omrajenimbalkar #धाराशिव #omraje_nimbalkar pic.twitter.com/OmrNjEL4Uy
शिवसेना ठाकरे गटाने काय म्हटलं?
“बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली! धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली.”, असं शिवसेना ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट करत ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली!!
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 22, 2025
धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर… pic.twitter.com/VEftZcfytu
मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलं कौतुक
“सध्याच्या राजकारणातील कोहिनूर, नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाही. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले. त्यामुळेच सुमारे ३.३० लाख मतांनी निवडून आले. ओमबद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे. तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे. सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे”, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
“या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम तु लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहे ते उत्कृष्ट असेच आहे पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे. राजकारणी म्हणून नव्हे तर ओमराजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे”, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.