महाराष्ट्राच्या विधीमंडळाबाहेर आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. दोघेही हसत, गप्पा मारत विधीमंडळात गेले. हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबद्दल विचारले असता, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहतोय.”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धवजी आणि देवेंद्रजी हसत-बोलत गेले तर सकाळचा भोंगा बंद होईल.” असं म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, “अशा चित्रांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहातोय. देवेंद्रजी, उद्धवजींनी एकत्र काम केलं पाहिजे. सर्वांनी एकमताने काम केलं पाहिजे. विरोधी पक्षांनी विधायक काम करून सरकारला सूचना दिल्या पाहिजेत.”
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “विरोधी पक्षांनी सरकारला सूचना कराव्या, मग सरकार त्यावर काम करेल. जशी काल राजसाहेबांनी (मनसे अध्यक्ष राज ठाकरे) माहिम येथील अनधिकृत बांधकामाची माहिती दिली. त्यानंतर आज सरकारने कारवाई करून ती चूक दुरुस्त केली.”
हे ही वाचा >> “इतक्या तातडीने कारवाई करण्याची गरज काय?” माहीम मजार प्रकरणावरून अबू आझमींचा सरकारला सवाल
“विरोधी पक्षांनी सरकारला टोमणे मारण्यापेक्षा एक काम सांगावं”
बावनकुळे म्हणाले की, “विरोधी पक्षांनी रोज सकाळी सरकारला टोमणे मारण्यापेक्षा एक काम सांगितलं पाहिजे. विरोधी पक्षांनी रोज चुका सांगाव्या आणि सरकारने त्या दुरुस्त कराव्या. सर्व पक्षांनी महाराष्ट्र कसा पहिल्या नंबरवर जाईल, यासाठी काम केलं पाहिजे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी राज्यासाठी काम केलं पाहिजे.”