राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी कुठेही जात नाही. मी जिथे आहे तिथेच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान देत दंड थोपटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. महाविकास आघाडीतले दोन महत्त्वाचे पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भाजपाने खुबीने फोडले आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह देखील अजित पवारांना देण्यात आलं आहे. या सगळ्या परिस्थितीवर जयंत पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलंं आहे.

एनडीए, भाजपात इनकमिंग

लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केलं. मात्र भाजपा प्रवेशाच्या या सगळ्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्या आहेत. तसंच राष्ट्रवादीतल्या फुटीवर त्यांनी भाष्य केलं.

हे पण वाचा- भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी सोडलं मौन; म्हणाले, “मी…”

आमचा पक्ष फुटलाय पण…

“मी कुणाशीही संपर्क केलेला नाही. तसंच भाजपाच्याही एकाही नेत्याने माझ्याशी संपर्क केलेला नाही, हे मी स्पष्ट करतो. शिवाय आमचा पक्ष फुटला आहे आमच्या पक्षातून काही लोक निघून गेले आहेत. मात्र आता आमचा पक्ष महाराष्ट्रातल्या तरुणांना घेऊन पुढे येतो आहे. आमचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करु.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटील जिथे आहेत तिथे सुखी आहेत का?

आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी तलाक घेतला आहे आता आम्ही विकासाचा संसार करतोय असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. यावर विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “कुणाशी कितीवेळा तलाक घेतला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आत्ता ते जिथे आहेत तिथे सुखी आहेत का? तिथे सुखी असतील तर काही कुणाचं म्हणणं नाही. पण ते तसं दिसत नाही हीच तर महाराष्ट्रापुढे असलेली शोकांतिका आहे ” असं म्हण जयंत पाटील यांनी गुलाबरावांना उत्तर दिलं आहे.