पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून नदी पत्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे येथील भीमा अर्थात चंद्रभागा नदीला आलेला पुराचा धोका टळला आहे. सध्या भीमा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले आहे. मात्र, हे पाणी रात्री उशिरा ओसरू लागले आहे. तरी देखील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणत पाणी येत होते. उजनी धरण हे १०५ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्याचा परिणाम भीमा नदीला बसला. तर दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी पुढे संगम येथे भीमा नदीला मिसळले जाते. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात वीर आणि उजनी धरणातील पाणी मुख्यत्वे येत होते. दरम्यान, वीर धरणातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. दुपारी २ वाजता नीरा नदीत ६५९५ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर उजनी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. शुक्रवारी पहाटे १ लाख ८० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. यात कमी करून ८० हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. तर भीमा नदीच्या पात्रात १ लाख ६७ हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. यात देखील घट होत आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पालिकेने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जवळपास ३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे. या सर्व नागरिकाना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चहा, नाष्टा, जेवण देण्यात येत आहे. शहराच्या नजीक असलेला गोपाळपूर येथील पुलावर नदीचे पाणी आले होते. त्यामुळे पुढे जाणारी वाहतूक बंद केली होती. तर अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. रात्री पाणी ओसरू लागले असून, पुराचा धोका तूर्तास टळला आहे.