पंढरपूर : येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. बेळगाव येथील शुभम पावले असे मृत तरुणाचे नाव आहे. तो देव दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आला होता. त्यापूर्वी तो नदीत स्नानाला गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. चार तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नागरिकांनी स्नान करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, चंद्रभागेतील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.

आषाढी यात्रेसाठी प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान झाल्या आहेत. यासाठी अनेक भाविक वारीला जाण्यापूर्वी पंढरीत येवून देवाचे दर्शन घेवून मग वारीत सामील होतात. सध्या येथील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पात्रात पाणी असल्याने दर्शनाला आलेले भाविक स्नानाचा आनंद घेत असतात. मात्र, या वेळी नदी पात्रातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

बेळगाव येथील शुभम पावले हा युवक त्याच्या मित्रांसोबत पंढरीला आला होता. दर्शनापूर्वी तो व त्याचे मित्र चंद्रभागा नदीला स्नान करण्यासाठी गेले. शुभम हा स्नान करत असताना त्याला पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्राने आरडा ओरड केल्यावर स्थानिक कोळी बांधवांनी लगेच शोध घेण्यास सुरवात केली. तब्बल चार तासांनंतर शुभमचा मृतदेह काढण्यात आला. एक घटनेने यंत्रणा सतर्क झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आषाढी यात्रा पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. हे पाणी अकलूज येथून पुढे चंद्रभागा नदीला मिसळले जाते. तर दुसरीकडे उजनी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणत होत आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणी केव्हाही सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिला आहे.