निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसंतसं यात आता रंगत वाढत असल्याची पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी आता पंडितराव दौंड हे मैदानात उतरले आहेत. 82 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा दौंड यांनी पराभव केला होता. 1985 मध्ये परळी रेणापूर मतदारसंघात त्यांनी 3 हजार 500 मतांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे विरूद्ध पंकजा मुंडे हा सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, या निवडणुकीच धनंजय मुंडे बाजी मारतील की पंकजा मुंडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचंही पहायला मिळालं होतं. तसंच धनंजय मुंडे यांनीदेखील परळीच्या जनतेला आता बदल हवा असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता माजी आमदार पंडितराव दौंड हे धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या दे गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या मतदारसंघात पंडितराव दौड यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसंच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. 1985 मध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा केलेला पराभव आजही सर्वांच्या लक्षात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ते नव्या नेत्यांना साथ देण्याचंही आवाहन करत आहे. पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. सध्या पंडितराव दौंड आणि संजय दौंड यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आहे.