परभणी : परभणी शहर व परिसरात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण उडवली असून स्थानिक अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचे पाणी चक्क घरात घुसल्याने अनेक कुटुंबांना अक्षरशः जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले तर कुटुंबातल्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास पावसाला अचानक प्रारंभ झाला. पावसाचा जोर प्रचंड होता. विजांचा कडकडाट आणि पावसाचा अफाट जोर यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. यंदाच्या पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी झाली पण आज पहाटेच्या पावसाचा जोर हा यापूर्वी पेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. शहरातील सांडपाण्याचे नियोजन अद्यापही न लागल्याने वसमत रस्त्यासह अनेक ठिकाणी पाणी शिरले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडे जाणाऱ्या नव्याने झालेल्या उड्डाणपूला नजीकच्या वस्त्यांमध्ये चक्क काही घरात कंबरेइतके पाणी शिरले.

घरातल्या लहान मुलांना, वृद्धांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. तरीही शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. साईबाबा नगर, हडको परिसर आणि शहरात लगतच्या अनेक वस्त्यांना पाण्याचा वेढा पडला. कारेगाव रोड, उघडा महादेव या परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. शहरातल्या मोकळ्या मैदानावर पाणीच पाणी झाले. हे पाणी मिळेल तशा मार्गाने सखल भागातल्या वस्त्यांपर्यंत जाऊन ते घरात शिरल्याने अचानक उद्भवलेल्या या संकटाचा सामना कसा करायचा याचाच नागरिकांना धक्का बसला. जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाण गाठताना नागरिकांची तारांबळ उडाली.

तब्बल दोन ते अडीच तास हा ढगफुटी सदृश्य पाऊस सुरूच होता. शहरातल्या वस्त्यांमध्ये असलेल्या चिंचोळ्या रस्त्यात तर पाणीच पाणी झाले. अक्षरशः ओढ्या नाल्याप्रमाणे हे पाणी वाहू लागले. पहाटे सुरू झालेल्या या पावसाने सर्वत्र साचलेले पाणी काढायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत ही अनेक वस्त्या पाण्याने वेढलेल्या होत्या. या वस्त्यांमध्ये नागरिकांना सकाळपासून चहापाणी सुद्धा मिळाले नाही. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने चूल पेटणार कशी असा प्रश्न निर्माण झाला. मनपाच्या प्रभाग क्रमाक एक व दोन मधील मोहम्मदिया मशीद परिसरातील जम्मू कॉलनी, सेवक नगर, बरकत नगर, रहेमतनगर या वसाहतीत पावसाचे पाणी नदी नाल्याप्रमाणे वाहू लागले. धार रस्ता परिसरातील सागरनगरातही शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. परभणी पासून जवळच असलेल्या आर्वी या गावात पहाटे झालेल्या ढगफुटीने बहुतांश घरांमध्ये पाणी शिरले तर मोठमोठ्या रस्त्यांच्या जागीही तलाव झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज नोंदवल्या गेलेल्या पर्जन्यमानानुसार ग्रामीण भागातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी (७२.३ मि.मी.), माखणी (६६.५मिमी), पूर्णा तालुक्यातील लिमला (६६.३ मि.मी.), चुडावा – (६८.५ मि.मी.), पालम तालुक्यातील पालम (७६.० मि.मी), पेठशिवणी (९९.३ मिमी.) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.