आंबोली येथील फुलपाखरू महोत्सवात फुलपाखरांचा गाव म्हणून पारपोली (ता. सावंतवाडी) गावाची निवड करण्यात आली. महाराष्ट्रात फुलपाखरांची सर्वात जास्त विविधता पारपोलीत सापडते. पारपोलीत राज्यातील २२० पैकी २०४ प्रकारची फुलपाखरे आढळून आली आहेत, म्हणून हा बहुमान पारपोलीला देण्यात आला. तेथे फुलपाखरू उद्यान होण्याची गरजही या वेळी व्यक्त करण्यात आली.
मलबार नेचर कॉन्सर्वेशन क्लब, वनविभाग आदीच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या फुलपाखरू महोत्सवाच्या शानदार शुभारंभी पारपोली फुलपाखरांचा गाव म्हणून घोषित करण्यात आले.
या फुलपाखरू महोत्सवप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या उपाध्यक्ष उषा थोरात, मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, व्हिजन सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, सरपंच लीना राऊत, चौकुळ सरपंच रिना गावडे, पारपोली सरपंच अनुसया जाधव, राजेश देऊळकर, रमण कुलकर्णी, फारुख मेहतर, यश सौंदी, राजेंद्र ओवळेकर, हेमंत ओगले, महादेव भिसे, डॉ. अमोल पटवर्धन, सायली पालांडे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, हिमालयानंतर पश्चिम घाटात आंबोली हाच जैवविविधतेचा हॉटस्कॉट आहे. सावंतवाडी संस्थानचे लोकप्रिय राजे श्रीमंत बापूसाहेब महाराजानी आंबोलीत जैवविविधतेच्या संरक्षणासाठी संस्थान काळात संरक्षित वन घोषित केले होते, आता निसर्गात गुंतवणूक करून रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारचे धोरण आहे असे केसरकर म्हणाले.
कोकण ग्रामीण पर्यटनात आंबोली, चौकुळ व गेळेची निवड करण्यात आली आहे. या पर्यटनात गुंतवणूक करणाऱ्या स्थानिकांना बँकेची योजना आणून फक्त दोन टक्के व्याजाने गुंतवणूक करता येणार आहे.
ग्रामीण पर्यटनात तशी तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगून औषधी वनस्पती उद्योगासाठी दोन कोटीची तरतूद आहे स्पष्ट केले.
आंबोलीत अॅनिमल पार्क, औषधी वनस्पती उद्योग, जंगल सफर, वनबाग अशा योजना असून वन्यप्राणी दर्शनही घेता येईल, त्यासाठी सुमारे ७ किमीचा ट्रॅक उभारून बॅटरी कार सुरू करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले, वन्यप्राणीदर्शन वेळी शूटिंगच्या कॅमेऱ्याच्या आड बंदुकीने शूटिंग करण्याविरोधात कडक धोरण आखले जाईल, असे त्यांनी सांगितले. या भागातील वनस्पतीत नॅचरल कलर्स आहेत. त्या प्रकल्पातदेखील प्राधान्य दिले जाईल. आंबोलीत धबधबे, इको टुरिझम व बॅटरी ऑपरेट कारचा प्रकल्पासाठी एकूण पाच कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात सहा हजार हेक्टर काजूचे क्षेत्र सेंद्रिय करण्यात येणार असून आंबोलीतदेखील सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले.
सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर ट्री हाऊस प्रकल्प प्रस्तावित आहे. तळकर वनबाग विकास, जैवविविधता संरक्षण, निसर्ग व पर्यावरणरक्षण तसेच आंबोलीत फुलपाखरू उद्यान करण्याचे धोरण आहे, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगून वनखात्याच्या क्षेत्रात प्लास्टिक बंदी आणून दंडनिहाय कारवाई करावी असे आवाहन केसरकर यांनी केले.
या वेळी बॉम्बे हिस्ट्री सोसायटीच्या उपाध्यक्षा उषा थोरात म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला निसर्गसंपन्नता लाभली आहे, त्याचे संरक्षण व संवर्धन करताना जैवविविधतेला प्राधान्य द्यावे. आंबोलीचा फुलपाखरू महोत्सवाचे कौतुक त्यांनी केले.
या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, मी एक निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी म्हणून या ठिकाणी आलो आहे. जैवविविधता जास्त लोकांपर्यंत पोहचवून रोजगाराचे साधन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू या. त्यासाठी र्सवकष माहिती संकलित करण्याचा पुढील काळात प्रशासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही चौधरी यांनी दिली.
वनसंरक्षक एम. के. राव यांनी पश्चिम घाटात पूर्वीपासून वाघाचा वावर असल्याचे सांगत तिलारी व कोल्हापूरकडील तिलारी कडच्या भागाची जैवविविधतेची स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे सांगून तिलारी, आंबोलीची दहा मिनिटांची शॉर्टफिल्म राधानगरीच्या धर्तीवर निर्माण करण्याचा मनोदय राव यांनी व्यक्त करून महाबळेश्वरमध्ये दहा गाव जैवविविधता सांभाळात आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्याचे सांगितले.
या वेळी रमण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर हेमंत ओगले यांनी फुलपाखरू गावची मांडणी केली. या वेळी महादेव ऊर्फ काका भिसे यांनी सर्वाचे आभार मानले. व्हिजन सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष बाळासाहेब परुळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार उषा थोरात, जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.