कराड : पश्चिम घाट क्षेत्रातील दमदार आणि कोयना पाणलोटातील दमदार पाऊस ओसरला आहे. त्यात कोयना धरणातील पाण्याची आवक घटल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेसहा फुटांवरून चार फुटांपर्यंत कमी करून प्रतिसेकंद २९,६४६ क्युसेकचा (घनफूट) जलविसर्ग १९,७२४ क्युसेक असा घटवण्यात आला आहे.
धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा जलविसर्ग कायम आहे. पावसाचा ओसरलेला जोर आणि धरणातून घटवलेला जलविसर्ग यामुळे कृष्णा-कोयना नद्यांची जलपातळी स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. कोयना धरणातून एकंदर २१,८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असताना, सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून ७,१३७ क्युसेक, कण्हेरमधून ४,२९०, तारळी प्रकल्पातून ३,५४९, धोम- बलकवडी ७४०, उरमोडी धरणातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयनेच्या जलसाठ्यात २.८७ टीएमसी (अब्ज घनफूट) वाढ होऊन जलसाठा ८५.४४ टीएमसी (८१.१८ टक्के) झाला आहे. धरणातील पाण्याची आवक ५०,९४५ क्युसेकवरून ३३,३१८ क्युसेकपर्यंत खाली आली आहे.
कोयना पाणलोटात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ४५ मिमी पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी ३,१५४.३३ मिमी (एकूण वार्षिक सरासरीच्या ६३.०८ टक्के) पावसाची नोंद आहे.
सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरला १५, नवजाला १२, तर कोयनानगरला ११ मिमी; तर, अन्य धरण क्षेत्रांत किरकोळ ते मध्यम पावसाचे चित्र आहे.