उपेक्षित वर्गातील कलाकारांसाठी ‘कलाविश्व’!

करोना काळात सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ

करोना काळात सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ

मुंबई : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांतील भटक्या-विमुक्त समाजांसह अन्य उपेक्षित वर्गामधील विखुरलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ  उपलब्ध करून दिले आहे. ‘कला विश्व’ नावाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत रविवारी वांद्रे-कु र्ला संकुल येथील परदेश भवनात झाले.

देशभरात १७ कार्यालयांद्वारे शिष्यवृत्ती देऊन परिषदेने जवळपास १ लाख परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीशी ओळख करून देण्याचे कार्य पार पाडले आहे. याचाच एक भाग म्हणून कलाविश्व कार्यक्रमात परदेशी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. वाघ्या मुरळी, गोंधळ, वासुदेव किंवा दशावतार यांसारख्या पारंपारिक कलांची जोपासना करणाऱ्या कलाकारांना करोनाच्या काळामध्ये त्यांची कला सादर करता यावी आणि आर्थिक मदतही मिळावी यासाठी ‘कलाविश्व’चे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या १७ केंद्रांमधून दर महिन्याला २ किंवा ३ कार्यक्रम आभासी पद्धतीने सादर केले जातील. रविवारी मुंबई, पुणे आणि गोवा केंद्राद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कणकवलीचे कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दशावतार या नाटय़प्रकाराचे सादरीकरण के ले. ओमप्रकाश यांनी ३ दशकांहून अधिक काळ दशावताराचे सादरीकरण के ले असून त्यांना दशावताराचे बालगंधर्व म्हटले जाते. त्यांनी अनेक पुरस्कारही प्राप्त के ले आहेत. परिषदेच्या पुणे केंद्रातर्फे याच मालिकेअंतर्गत पारंपरिक भारूड सादर करणारे कलाकार लक्ष्मण महाराज राजगुरू तसेचवाघ्या-मुरळी कलावंत श्रीकांत शिवाजी रेणके यांची सादरीकरणे होणार आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी कार्यक्रमाचे समालोचन इंग्रजीत असणार आहे.

वाघ्या मुरळी, दशावतार, अशा पारंपरिक   कलांची उपासना करणारे कलाकार लोकांमध्ये जाऊन कला सादर करून उदरनिर्वाह करत असतात. करोनामुळे गेले दीड वर्ष या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची कला आभासी माध्यमातून देशी-विदेशी कलारसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलाविश्वच्या माध्यमातून केले जाईल. यामुळे काही प्रमाणात या कलाकारांना मदत मिळू शकेल. शिवाय परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळखही होईल.

— डॉ. विनय सहस्रबुद्धे, अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद

https://www.facebook.com/100011577452371/videos/556815002110692/ या लिंकवर कलाविश्वमधील विविध सादरीकरणांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Platform provided for artists with nomadic communities by indian council for cultural relations zws