सदानंद आश्रमाभोवती तीन हजार पोलीस तैनात; मनाई आदेश लागू, आश्रम वाचविण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

वसई पूर्वेतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र ही कारवाई थांबविण्यात यावी यासाठी आश्रम संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयात याबाबतची सुनावणी २ सप्टेंबर (सोमवार) रोजी होणार असल्याने सध्या तरी कारवाई थांबविण्यात यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आले असल्याची माहिती आश्रम संस्थेने दिली आहे.

वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर डोंगरावर ४८ वर्षांपासून बालयोगी सदानंद महाराज यांचा आश्रम उभा आहे. याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्ते देबी गोयंका यांच्या ‘कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालाने निर्णय देताना आश्रम बेकायदा ठरवला आणि त्यावर कारवाई करण्याचे आदेश वनविभागाला दिले. यासाठी आठवडय़ाचा कालावधी देण्यात आला होता. परंतु या आदेशानंतर कारवाईसाठी अडचणी निर्माण झाल्याने विहित मुदतीत कारवाई होऊ  शकली नव्हती. यावर न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत हा आश्रम जमीनदोस्त करण्यात यावा, असे आदेश दिल्याने वनविभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. कारवाईसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ  नयेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तीन हजार पोलीस डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

कारवाईसाठी दोन जेसीबी, पोकलेन यासह इतर सामग्री आश्रमाच्या ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत.

दरम्यान या कारवाईविरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना कारवाई थांबविण्यात यावी, असे पत्र देण्यात आले आहे. गुरुवारी याबाबत सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार असल्याने सध्या ही कारवाई थांबविण्यात आल्याचे ‘श्री बालयोगी आश्रम संस्थे’चे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले आहे.

तसेच याबाबत माजी राज्यपाल राम नाईक यांनीसुद्धा ही कारवाई थांबविण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. आश्रमाच्या परिसरात भक्तांनी मंगळवारपासून चक्री उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे सध्या आश्रमाच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

बंद पाळून निषेध

वनविभागाने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालीमुळे भाविक भक्तांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत हा आश्रम वाचला पाहिजे यासाठी विविध प्रकारची आंदोलने, मेळावे मोहिमा घेतल्या जात आहेत. तर या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी वसई पूर्वेतील वालीव परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्यात अली होती. व पायी पदयात्रा काढण्यात आली होती यात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तर उभारण्यात आलेल्या अश्रामासाठीची जागा शासनाने आश्रमाला दिली आहे. यासाठी या आश्रमाच्या संदर्भातील जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. याबाबत २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यासाठीची सर्व कागदपत्रे ही वनविभाग व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली असल्याचे बचाव समितीने सांगितले आहे.

मनाई आदेश

आश्रमावरील कारवाईच्या आदेशांनंतर याभागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होऊ  नये यासाठी याभागात पर्यटन आणि तुंगारेश्वर पर्वतावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिरसाड फाटा ते पारोळ, पारोळ ते भिवंडी रोडवरील तिल्हेर गाव, चिंचोटी फाटा ते नागले गाव उत्तरेकडील बाजूस व इतर सर्व मार्ग बंद करून आजूबाजूच्या परिसरात २६ ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.