अलिबाग : अलिबाग अल्पवयीन मुलांना तसेच तरुणांना उत्तेजक इंजेक्शनची अवैध विक्री करण्याचा उद्योग एकाने अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे सुरू केला होता. पोलीसांना या गोष्टीचा सुगावा लागताच त्यांनी धाड टाकून उत्तेजक औषधांचा साठा जप्त केला, अवैध औषध विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले.
वेल्डीगच्या व्यवसाय करणाऱ्या सुरज मनोज राणे याने आपल्या दुकानात बेकायदेशीरपणे उत्तेजक आणि नशाकारक औषधांचे वितरण सुरू केले होते. आसपासच्या परिसरातील अल्पवयीन मुले आणि तरूण त्याच्याकडे येऊन या औषधांची इंजेक्शन खरेदी करत होती. व्यायामशाळेत उत्तेजना वाढवण्यासाठी तसेच नशाकरण्यासाठी मुलांकडून या औषधाचा सऱ्हास वापर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना मिळाली होती. पोलीसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर आक्षी येथील सुरज राणे यांच्या वेल्डीग वर्कशॉपवर धाड टाकली. त्यावेळी त्याच्याकडून एकूण ४ हजार ८५६ रुपयांचे मेन्टरमाईन सप्फेटची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, २७८ अन्वये सुरजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न व औषधी प्रशासनाकडून ड्रग्ज अँण्ड कॉस्मॅटीक अँक्ट मधील तरतुदींनुसार स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक किशोर साळे यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या उत्तेजक आणि नशाकारक इंजेक्शनच्या सेवनाने, रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, अथवा किडनी निकामी होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे मुलांनी अशा वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या उद्देजक तसेच नशाकारक औषधांचे सेवन करणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे व्यायामशाळेत जाणाऱ्या तरुणांनी या प्रकारांपासून दूर रहावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांकडून अशी इंजेक्शन घेतली जात नाही ना याची खातरजमा करावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे, पोलीस हवालदार विलास आंबेतकर, परेश म्हात्रे, महिला पोलीस शिपाई कोमल धोईंजे, सायली थिटे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
