विविध यात्रेच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेउन दुचाकी व भ्रमणध्वनी लंपास करणार्‍या कर्नाटकातील तरूणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये चोरलेल्या ११ दुचाकी व चार भ्रमणध्वनी असा साडेसात लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी दिली.

मोदीनसाब सरदारसाब वालीकर (वय 21 रा. हैनाळ, ता. इंडी जि. विजापूर) हा जत तालुक्यातील व्हसपेठ ते गुड्डापूर या रस्त्यावर विना नोंदणी क्रमांकाची दुचाकी घेउन येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आमसिध्दा खोत यांना मिळाली होती. या माहिती आधारे सहायक फौजदार अच्युत सुर्यवंशी व अमोल ऐदळे, वैभव पाटील, सागर टिगरे आदींच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या विना नोंदणी क्र्रमांकाच्या दुचाकीबाबत विचारले असता समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. यामुळे त्याला ताब्यात घेउन कसून चौकशी केली असता त्यांने चोरीची कबुली दिली.

हेही वाचा : सांगली : थर्टी फर्स्टसाठी ४५ हजार परवाने वितरीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच विविध यात्रांच्या ठिकाणी चोरी केलेल्या अन्य १० दुचाकी व्हसपेठ गावच्या हद्दीमध्ये दावल मलिक देवस्थानसमोरील दोन डोंगरामधील पैगंबर पाटली यांच्या शेतातील लिंबाच्या झाडीमध्ये लपविल्या असल्याचे सांगितले. पोलीसांनी चोरीच्या सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विजापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून या दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याच्याकडे चार भ्रमणध्वनीही सापडले आहेत. अथणी, कोकटनूर, गुड्डापूर यात्रेमधून या चोर्‍या त्यांने केल्या आहेत.