छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीत पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान झालेल्यांना दोन दिवसांत काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तर भाजपचे आमदार रमेश कराड यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात मदतीचे वाटप केले. प्रत्यक्षात ही मदत लाभार्थींच्या बँक खात्यावर आरटीजीएसने जमा झाली. श्रेयाच्या लढाईत दोन्ही आमदारांकडून मदत वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले. आता देशमुख यांनी शासकीय कार्यालयात तर कराड यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात मदत वाटप केल्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
२७ मे २०२५ रोजी लातूर शहरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी सखल भागातील वस्त्यांमध्ये घुसले. घरात पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अशा घटना यापू्र्वी शहरात घडल्या आहेत. पावसाचे पाणी घरात घुसल्यानंतर नैसर्गिक आपत्तीतून मदत मिळत असल्याचा नागरिकांना अनुभव आहे. काही वर्षांपू्र्वी अशा मदतीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयात तोबा गर्दी केली होती. मदतीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी मंत्री देशमुख भर पावसात घरामध्ये पाणी घुसलेल्या वस्त्यांमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात घुसलेले पाणी कमी होण्याच्या आधी पंचनाम्याचा आग्रह धरत प्रशासनाला कामाला लावले.
प्रशासनानेही तातडीने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार ५४८ नागरिकांना प्रत्येकी दहा हजार रुपयाप्रमाणे मदत मंजूर झाली. ही मदत सरकारच्या थेट लाभ हस्तांत्तर (डीबीटी) धोरणानुसार लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा झाली. मात्र, मदतीचे श्रेय घेण्यासाठी शनिवारी आमदार देशमुख यांनी लाभार्थींच्या बँक खात्यावर मदत जमा केल्याच्या आरटीजीएसची प्रिंट काढून त्याचे वाटप केले. दुसरीकडे हा कार्यक्रम शासकीय कार्यालयात घेऊन त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याचा आव आणला.
त्यांची री ओढत आमदार कराड यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये लातूर तालुक्यातील मुरुड व भातखेडा येथील ७७ नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे तब्बल दहा महिन्यांनी मंजूर मदतीचे रविवारी वाटप केले. आमदार कराड यांनी मात्र, हा कार्यक्रम स्वतःच्या संपर्क कार्यालयात घेतला. देशमुखांप्रमाणेच आरटीजीएसच्या प्रिंटचे त्यांनी लाभार्थींना वाटप केले. लाभार्थींना मुरुड व भातखेड्याहून बोलावून घेण्यापू्र्वीच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे व तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते. कार्यक्रमात कराड यांनी शक्तिपीठ महामार्गाचे जोरदार समर्थनही केले.
पक्ष कार्यालयात कार्यक्रमावरून टीका
आमदार कराड यांनी नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या वाटपाचा कार्यक्रम पक्ष कार्यालयात घेतल्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष घोडके यांनी कराड यांनी आमदार देशमुख यांच्या कार्यक्रमाचे अनुकरण करून आमदार कराड यांनी पक्षाचा निधी वाटप केल्यासारखा दिखावा केला. नैसर्गिक आपत्तीच्या मदतीचे शासकीय कार्यालयातून वाटप करण्याऐवजी पक्ष कार्यालयात घेऊन त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचेही घोडके यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.