राज्याच्यादृष्टीने आज ऐतिहासीक दिवस आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जात महाविकास आघाडी निर्माण करणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याचबरोबर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार आहे. सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी कालपासूनच जय्यत तयारी सुरू आहे, याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेर व मुंबईभर शिवसैनिकांनी जागोजागी अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. शिवसेनाभवनाच्या परिसरात लावण्यात आलेल्या एका बॅनर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबरोबरचे फोटो देखील दर्शवण्यात आले आहेत.
”सत्यमेव जयते मा. बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न साकार, मुख्यमंत्री शिवसेनेचा” असे या बॅनरवर फोटोंबरोबर नमूद करण्यात आलेले आहे. या फोटोद्वारे महाविकास आघाडीचा संदेश देण्यात आल्याचे दिसत आहे.
Mumbai: Poster featuring picture of Bal Thackeray and Indira Gandhi seen near Shiv Sena Bhawan
Read @ANI Story | https://t.co/PWOxD4aH8Q pic.twitter.com/Haso97sKQj— ANI Digital (@ani_digital) November 27, 2019
महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.