कोल्हापूर : ‘इटालियन फॅशन शो’मध्ये प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडकडून वापरण्यात आलेली चप्पल कोल्हापुरी असल्याचे या कंपनीने मान्य केले आहे. याचबरोबर या कंपनीने कोल्हापुरातील चप्पल कारागिरांशी संवाद साधणार असल्याचेही एका पत्राद्वारे कळवले आहे.

प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँड नावासह बाजारात आणली. तसेच या पादत्राणाचे ‘इटालियन फॅशन शो‘मध्ये सादरीकरण केले. हा प्रकार लक्षात येताच त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरने तातडीने इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार करत तक्रार नोंदवली होती. त्यांच्या या पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत प्राडा कंपनीने ‘ती’ चप्पल कोल्हापुरी असल्याचे मान्य केले. तसेच, याबाबत कंपनी कोल्हापुरातील चप्पल कारागिरांशी संवाद साधणार असल्याचेही एका पत्राद्वारे कळवल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’चे प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी याबाबत महाराष्ट्र चेंबरशी पत्रव्यवहार केला आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे, की ‘प्राडा मेन्स २०२५ फॅशन शो’मध्ये दाखवलेली चप्पल ही शतकानुशतके जुना वारसा असलेली पारंपरिक भारतीय हस्तकला प्रकारातील पादत्राणे आहेत. आमची कंपनी हे मान्य करत असून, या शैलीची पादत्राणे बनवून घेत त्याचा व्यापार वाढवण्यास आम्ही तयार आहोत. यासाठी संबंधित स्थानिक भारतीय कारागीर समुदायाशी व्यापार संवाद करण्यासही वचनबद्ध आहोत. या सांस्कृतिक वारशाचा आम्ही आदर करतो. तो आजवर जतन करणाऱ्या विशेष कारागिरांबाबत ‘प्राडा’ला आदर आहे.