राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेवर नेमकं कोण जाणार? या चर्चांवर बुधवारी संध्याकाळी उशीरा पडदा पडला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी काही ‘तांत्रिक बाबीं’चाही उल्लेख केला. तांत्रिक बाबींमुळेच पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभा उमेदवारी दिली जात असल्याचं सुनील तटकरे म्हणाले. आता या तांत्रिक बाबी नेमक्या कोणत्या? यावर चर्चा सुरू झाली असताना त्याचे सूतोवाच पक्षाकडून देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे विद्यमान खासदार

प्रफुल्ल पटेल हे पूर्वीच्या संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. पक्षात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले. आता निवडणूक आयोगाने पक्षनाव व पक्षचिन्ह अजित पवारांना दिल्यामुळे तीच खरी राष्ट्रवादी असल्याच्या त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत एक उमेदवार पाठवता येणं शक्य होतं. त्यासाठी नेमकी कुणाची वर्णी लागेल? याची उत्सुकता असताना पक्षानं चार वर्षं टर्म शिल्लक असतानाही पुन्हा प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली.

अपात्रतेची टांगती तलवार!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाकडून राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर ते अपात्र ठरल्यास पुढे अधिक गुंता वाढू नये, म्हणून पक्षानं त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आता प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर निवडून आल्यानंतर ते आधीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील. त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची याचिका आपोआपच निकाली निघेल, असं गणित मांडलं जात आहे.

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे; पंकजा मुंडे यांचे नाव नाही

निवडणूक, राजीनामा आणि पुन्हा नवी जागा!

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे नव्याने जागा निर्माण होणार आहे. राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल निवडून आल्यानंतर त्यांना आधीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राज्यसभेत राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक जागा रिक्त होईल. या जागेसाठी जेव्हा पोटनिवडणूक लावली जाईल, तेव्हा इतर नावांचा विचार केला जाईल, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel rajyasabha candidate for ncp ajit pawar faction pmw
First published on: 15-02-2024 at 08:29 IST