Praful Patel on Uday Samant remark on Local Body Elections : चिपळूण येथील शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनी स्थानिक नेत्यांना व प्रामुख्याने मित्रपक्षांना इशारा दिला आहे. “आपल्याला महायुतीमधूनच निवडणुका लढवायच्या आहेत”, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर ते म्हणाले, “कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण (शिवसेनेचं निवडणूक चिन्ह) कसा चालतो ते आम्ही दाखवून देऊ.” स्थानिक स्तरावरील राजकारणात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाची भाषा करणाऱ्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सामंत यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याचं बोललं जात आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले, “चिपळूण तालुक्यात काहीजण स्वबळाची भाषा करू लागले आहेत, तर काहीजण म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणुका लढू आणि जिंकूनही दाखवू, आम्ही निवडणुका जवळपास जिंकलेलोच आहोत, आमच्याकडे अमुक संस्था आहेत, आमच्याकडे तमुक संस्था आहेत, त्यामुळे आमचा विजय हा जवळपास निश्चित आहे. आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत, अमुक तमुक शैक्षणिक संस्था आमच्या ताब्यात असून त्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत, अशी भाषा केली जात आहे. परंतु, माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला महायुतीतूनच निवडणुका लढवायच्या आहेत. परंतु, तरीदेखील कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवण्याची व्यवस्थाही केली जाईल.

“अशा वक्तव्यांना फार गांभीर्याने घ्यायचं नसतं”

सामंतांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “स्थानिक पातळीवर राजकारणात केलेल्या अशा वक्तव्यांना फारसं गांभीर्याने घ्यायचं नसतं. प्रत्येक नेता त्याच्या भागात वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून अशी वक्तव्ये केली जातात.”

प्रत्येकाला आपल्या भागावर वर्चस्व सिद्ध करायचं असतं : प्रफुल्ल पटेल

“प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपापल्या भागात आपलं कौशल्य दाखवण्याचा, वर्चस्व सिद्ध करण्याचा अधिकार असतो. अनेकदा स्थानिक स्तरावरील निवडणुकांमध्ये लोकांची काही भाषण असतात, वेगवेगळी वक्तव्ये असतात त्यांना इतकं महत्त्व देण्याची गरज नसते.”

“राज्यात व केंद्रात आमची सत्ता”

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आम्ही महायुतीत एकत्र आहोत. आम्ही एकत्र लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली आहे. दोन्ही निवडणुका जिंकत आम्ही केंद्रात व राज्यात आमचं सरकार स्थापन केलं आहे. दिल्लीत व मुंबईत आमचं सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर कोणी काही भाष्य केलं तर त्याला फार गांभीर्याने घ्यायचं नसतं.”