पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. यानंतर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पब मालकांवरही गुन्हा दाखल करत त्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेवर आता प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर अशी मस्ती येते. पैशामुळे असे लोभी लोक माणुसकी विसरत चालले आहेत. अशा अपघातामध्ये काही बदल होणं, अशा प्रकारे बेदरकारपणे कार चावलणं चुकीचं आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात”, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी पुणे अपघात प्रकरणावर बोलताना दिली.

हेही वाचा : पुणे : दोन अधिकाऱ्यांना निलंबित करुन कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

या सर्व गोष्टीवर बंधन येईल का? या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “कसं बधन येईल? कारण अधिकारी आणि नेत्यांना काही पडलेलं नाही. धर्म जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही झुकवली जात असेल, मत खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सामान्य माणसांच्या जीवनाला आणि मरणाला काय अर्थ आहे? ज्याची मेहनत कमी त्यांना पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी अशी येथील परिस्थिती आहे”, असं बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.

नेमकी घटना काय घडली?

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श ही कार मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या वडीलांना अटक केलेली आहे. तसेच पब मालकांवरही गुन्हे दाखल करत त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असताना याप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.