Prakash Ambedkar post on Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे त्यांच्य आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासा बसणार आहेत. यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण राज्यातील सरकारसुध्दा उलथून टाकू शकतो, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सोमवारी दिला. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल भाष्य करत गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले आहेत. “मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत,” असे प्रकाश आंबेडकर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. इतकेच नाहीतर अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील अनेक प्रस्थापित मराठा सत्तेत होते होते. ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता असेही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले आहे.

मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण…

“तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका,” असे अवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?” असा सवालही आंबेडकरांनी या पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे.

२९ ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन

अंतरवाली सराटी येथे सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे यांनी माहिती दिली की, २७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथून शहागड, पैठण, शेवगाव, पांढरी पूल, आळेफाटा मार्गे मराठा समाज शिवनेरी गडावर मुक्कामासाठी पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूरमार्गे रात्री मुंबईत आझाद मैदानावर पोहोचेल. २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उपोषणास सुरुवात होईल. आंदोलनाच्या ठिकाणी कीर्तन, भजन आणि शाहिरांच्या पोवाड्यांचे कार्यक्रम होतील.