कराड : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा होणार आहेत.

आज अहमदाबाद काँग्रेस कमिटीमध्ये पोहचल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आदरांजली अर्पण केली.गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून, मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने चांगलीच टक्कर दिली होती. यावेळच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने कंबर कसली आहे. गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

हेही वाचा: “माझ्या मुलीला मैत्रिणी विचारत आहेत की तुझ्या वडिलांनी…”; विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीनाम्याबद्दल बोलताना आव्हाडांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी उत्तमरित्या जबाबदारी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ साली गुजरातमध्ये १२ खासदार निवडून आणले आहेत. त्याच वर्षी या निर्णायक गुजरातच्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता आणि काँग्रेसपक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता. ही महत्वाची घटना काँग्रेस मुख्यालयात नोंद असल्याने यावर्षीच्या गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख विभागांची जबाबदारी दिलेली असल्याचे चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.