शिक्षकांच्या बदल्यांबाबत मात्र अडचणी

ग्रामविकास विभाग दरवर्षी नव्या नव्या नियमांची अंमलबजावणी करत, दरवेळी नव्याने बदल्यांचे आदेश जारी करत असते. यंदा मात्र गतवर्षीप्रमाणेच बदल्या करण्याचे आदेश आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांचे आदेश ग्रामविकास विभागाने अखेर जारी केले. मात्र यातील वेळापत्रक नगर जिल्ह्य़ात हुकल्याने आता जिल्ह्य़ांतर्गत बदल्यांसाठी दि. १८ ते २१ मे व तालुकांतर्गत बदल्यांसाठी २१ ते २५ मे असे सुधारित वेळापत्रक ठरवले गेले आहे. प्रशासकीय बदल्या १० टक्के तर विनंती बदल्या शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचा-यांसाठी ५ टक्के तर इतर कर्मचा-यांसाठी १० टक्के करण्याचे आदेश आहेत. मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा निर्णय स्वतंत्रपणे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे.
ग्रामविकास विभाग दरवर्षी नव्या नव्या नियमांची अंमलबजावणी करत, दरवेळी नव्याने बदल्यांचे आदेश जारी करत असते. यंदा मात्र गतवर्षीप्रमाणेच बदल्या करण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे विभागाने बदल्यांचे धोरण ठरवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त व आयुक्त यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. त्या प्राप्त झाल्या, मात्र त्याची छाननीच सुरू असल्याने अखेर गतवर्षीप्रमाणेच प्रमाण ठरवले गेले आहे.
बदल्यांचे आदेश जारी करताना विभागाने काल, सोमवारी आधी तालुकांतर्गत व नंतर जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यात आज, त्यात सुधारणा करत आता प्रथम जिल्हांतर्गत (५ मे ते १५ मे) व नंतर तालुकांतर्गत (१६ ते २५ मे) बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे वेळापत्रक हुकल्याने जि. प.ने दि. १८ ते २१ जिल्हांतर्गत व दि.२१ ते २५ मे दरम्यान तालुकांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. बदल्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आज सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली व सुधारित वेळापत्रक निश्चित केले.
प्राथमिक शिक्षकांची गेल्या वर्षीच्या संच निश्चितीस जैसे थे ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे यंदा समायोजनही होऊ शकलेले नाही. परिणामी रिक्त जागांची संख्या किती हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या कशा करायच्या याबद्दल अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल मंगळवारी नाशिक येथे होते. ते परतल्यानंतर याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच बुधवारी शिक्षण संचालकांनी बैठकही आयोजित केली आहे. त्यामध्येही याबाबत चर्चा होणार आहे, त्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण ठरेल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Problems regarding the transfer of teachers

ताज्या बातम्या