सांगली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. वेतन अनुदानाची रक्कम मिळण्यास दर महिन्याला विलंब होत असल्याने ग्रामपंचायतीने स्वअनुदानातून पगार करावा, वेतनाची व फरकाची देयके अदा करण्यात यावीत आदी मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.
ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार सुधारित किमान वेतनाची त्वरित अंमलबजावणी करावी, राहणीमान भत्ता जाहीर झाल्याप्रमाणे मिळावा, भविष्य निवार्ह निधीची रक्कम फरकासह जमा करून त्याच्या नोंदी कर्मचार्यांना उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब झुरे, जनरल सेक्रेटरी कॉ. राहुल जाधव, नवनाथ मोहिते, माणिक देसाई, बलराम सावंत, अनिल पाटील, विठ्ठल काळे आदींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले.
निवेदनात जिल्हा परिषदेतील दहा टक्के रिक्त पदाचा अनुशेष जाहीर करून रिक्त पदाची त्वरित भरती प्रक्रिया राबविण्याात यावी, ड वर्गातील पद भरती अनुकंपा तत्वावर करण्यात यावी, निवृत्त कर्मचार्यांना अंशदान अनुदान व थकित पगार विनाविलंब मिळावा, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी बँक खात्यावर शिक रक्कम कायम स्वरूपी ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीना द्यावेत, कामगारांना कामावरून कमी करणे, पदाचा गैरवापर करून नाहक त्रास देणे हे बंद व्हावे यासाठी पदाधिकार्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून आदेश देण्यात यावेत, दिपावली पुर्वी कामगारंाना सानुग्रह अनुदान मिळावे, वसुलीसाठी प्रशासनाचे सहकार्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषेदवर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चास जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीचे कामगार सहभागी झाले होते. मागण्या विनाविलंब मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.