ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना बुधवारी न्यायालयाने दणका दिला. विशेष न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आता कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले डी. एस. कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सुमारे ३५१ ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. शेवटी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी कुलकर्णी दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने कुलकर्णी दाम्पत्याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. बुधवारी विशेष न्यायालयात पुन्हा एकदा डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सुनावणी झाली. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. आता कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता असून पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फसवणूक प्रकरणात चार विशेष पथकांनी आठवडाभरापूर्वी कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयात एकाच वेळी छापे घालून काही पुरावे हस्तगत केले होते. दुसरीकडे मुंबई, कोल्हापूरमधील गुंतवणूकदारांनीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.

काय होते प्रकरण ?
डी. एस. कुलकर्णी उद्योगसमुहाची मुदत ठेवींची जाहिरात वाचून अनेकांनी पैसे गुंतवले. या योजनेला रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी असल्याची माहिती देण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून शेकडो वयोवृद्ध नागरिक तसेच महिलांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर सुरुवातीला व्याज मिळाले. मात्र गेले वर्षभर व्याज मिळणे बंद झाले होते. मुदत ठेवींची मुदत पूर्ण होऊन ९० दिवस उलटले तरी गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर डीएसकेंवर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल करण्यात आले. डीएसकेंनी १४०० कोटींचे कर्जही बँकाकडून घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune court rejects anticipatory bail to builder d s kulkarni in fraud case
First published on: 08-11-2017 at 16:14 IST