Eknath Khadse On Pranjal Khewalkar Rave Party : पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीतील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलं. प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असून यातील पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी या रेव्ह पार्टी प्रकरणाला संशयास्पद असल्याचं म्हणत अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी या कारवाईबाबत काही प्रतिक्रिया दिली का? त्यांच्याशी काही संवाद झाला का? याचा खुलासा आता एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रांजल खेवलकर यांच्याशी रोहिणी खडसे यांचा थोडक्यात संवाद झाल्याचं सांगत प्रांजल खेवलकर यांनी आपण कोणतंही ड्रग्स घेतलं नसल्याचं सांगितलं. तसेच त्या महिलांना मी ओळखत देखील नाही, असंही खेवलकर यांनी सांगितल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

प्रांजल खेवलकरांनी काय सांगितलं? खडसेंचा खुलासा

“रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत रोहिणी खडसे यांचं प्रांजल खेवलकर यांच्याशी थोडक्यात बोलणं झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शपथ सांगतो, मी कोणतंही ड्रग्स घेतलेलं नव्हतं. माझा खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे. कारण अशा प्रकारचे कोणतेही उद्योग मी केलेले नाहीत. त्या महिलांना मी ओळखत देखील नाही. मी माझ्या आयुष्यात या महिलांना कधी पाहिलंही नाही. त्या ठिकाणी त्या दोन महिला आल्या आणि काही वेळात त्या ठिकाणी पोलीस आले आणि मला धक्का बसला. असं प्रांजल खेवलकरांनी सांगितलं. दुसरी काही चर्चा झाली नाही”, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सर्व प्रकरण संशयास्पद…’ : एकनाथ खडसे

“मला हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटत आहे. अशा अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात, त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. या प्रकरणात आणखी काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढवू. पण सध्या जे सुरू आहे ते आम्हाला बदनाम करण्यासाठी सुरू असल्याचं दिसत आहे. आता त्या पार्टीत ज्या दोन महिलांचा समावेश आहे, त्या महिलांना त्या ठिकाणी प्लँट करण्यात आलं होतं”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाच जणांच्या पार्टीला तुम्ही रेव्ह पार्टी कशावरून म्हणता? या प्रश्नाचं उत्तर पोलीस आयुक्तांनी दिलं नाही. तसेच खासगी फोटो हे बाहेर कसे आले? या प्रश्नावर पोलीस आयुक्तांनी म्हटलं की त्रयस्त व्यक्तीने काढले असलील. मग जेव्हा एखाद्या ठिकाणी पोलीस छापा टाकतात तेव्हा ते क्षेत्र प्रतिबंधित असतं. त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मग असं असताना फोटो आणि व्हिडीओ कसे समोर आले? क्षेत्र प्रतिबंधित असताना पोलिसांनी त्रयस्त व्यक्तीला प्रवेश कसा दिला? त्यामुळे या प्रकरणात संशयाला जागा आहे. प्लँट केल्याशिवाय त्या महिला त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. पण आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचं जर ठरवलंच असेल तर उद्या अचानक आणखी काही नावे समोर येऊ शकतात”, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.