राहाता: मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी सामाजिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सामाजिक दृष्टिकोनातून झालेल्या निर्णयाचा विचार ते करतील अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी उपसमिती नेमली आहे. राज्यात सद्भावनेचे वातावरण असावे, यासाठी सर्वपक्षांचे प्रतिनिधित्व यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे विखे यांचा शिर्डी सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या भूमीतून श्रध्दा आणि सबुरीचा संदेश घेऊनच आपण आझाद मैदानातील आंदोलनाला सामोरे गेलो होतो. दडपण होते पण मुख्यमंत्री फडणवीस आणि सहकारी मंत्र्याच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा आत्मविश्वास मनात निश्चित होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकलेला विश्वास सार्थ करता आला. मराठा समाजाचे स्वप्न पूर्ण करता आल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
ओबीसी संघटनेचे नेते तायवडे यांच्या भूमिकेचे आपण स्वागत करतो, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हेच त्यांनी बोलून दाखवले आणि सरकारची सुध्दा हीच भूमिका असतानाही काही लोक जाणीवपूर्वक वेगवेगळी वक्तव्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याची टीका विखे यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता केली. झालेल्या निर्णयाबद्दल सरकारची केव्हाही चर्चा करण्याची तयारी आहे. मराठा समाजातील काही नेत्यांनाही व्यासपीठावर भूमिका मांडण्याची संधी होती. केवळ बंद खोलीतून भूमिका व्यक्त करून दिशाभूल न करण्याचे आवाहन विखे यांनी मराठा समाजातील नेत्यांना केले.
मुंबई ठप्प झाली तर वावगे काय?
शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले, मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्र्यांनीच दिलगिरी व्यक्त केली आहे. आंदोलनात मुंबई महापालिका व पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले. मराठा समाजाच्या काही भावना होत्या. त्यासाठी रस्त्यावर यायचे नाही तर कुठे यायचे, मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर त्यात वावगे कायॽअसा प्रश्न विखे यांनी केला.