Rahul Gandhi on Maharashtra Assembly Election Results 2024 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठा घोळ झाल्याचा दावा सातत्याने केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत वाढलेल्या मतदानाची आकडेवारी, वाढलेले मतदार यासह मतदानाच्या निकालावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले होते. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणात वाढलेल्या मतदारांवरून सातत्याने आक्षेप घेतला आहे. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी न्यूजलॉन्ड्री या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात (दक्षिण-मध्य नागपूर) शेवटच्या पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढले आहेत. तर, काही बूथवर २० ते ५० टक्के मतदार वाढले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांच्या संख्येवरून निवडणूक आयोगाला सतत्याने प्रश्न विचारले आहेत. आता त्यांनी फडणवीसांच्या मतदारसंघातील आकडेवारीवरून मोठा दावा केला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले, “बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी (BLOs) अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार केली आहे. ज्यांच्या पत्त्यांची पडताळणी झालेली नाही असे हजारो मतदार प्रसारमाध्यमांनी शोधून काढले आहेत. मात्र, या सगळ्यावर निवडणूक आयोगाने मौन बाळगलं आहे. निवडणूक आयोगही या घोटाळ्यात सहभागी आहे का? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे असे अनेक घोळ समोर येत आहेत. ही एक प्रकारची मतांची चोरी आहे. मात्र निवडणूक आयोग व सरकार हे सगळं झाकण्याचा प्रयत्न करतंय. हीच त्यांची कबुली नव्हे का? म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार याद्या आणि मतदानाचं सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत.”.
बिहार यूथ काँग्रेसने म्हटलं आहे की “देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सहा महिन्यांमध्ये २९,२१९ नवे मतदार आले आहेत. याचाच अर्थ दररोज १६२ नव्या मतदारांची नोंद झाली आहे. मतदारसंख्येत ८.२५ टक्के वाढ झाली आहे”.