अलिबाग – परतीच्‍या पावसाने जाता जाता दणका दिल्‍यानंतर आता रायगडसह संपूर्ण कोकण किनारपटटीवर पाऊस सुरू झाला आहे. या पावसाने जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. रायगड जिल्‍हा प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पावसाच्‍या धसक्‍याने रायगडमधील शेतकरयांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत. दुसरीकडे खराब हवामानाचा फटका जलवाहतूकीला बसला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पटृटा निर्माण झाल्‍याने कोकणासह राज्‍याच्‍या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तवला आहे. रायगडसह संपूर्ण कोकणात 30 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्‍यात आला आहे. रायगड जिल्‍हयाच्‍या सर्वच भागात अवकाळी पावसाने सुरूवात केली आहे. शनिवारी संध्‍याकाळपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग जमायला सुरूवात झाली होती. रविवारी सकाळपासूनच जिल्‍हयाच्‍या काही भागात अधूनमधून पावसाच्‍या मध्‍यम स्‍वरूपाच्‍या सरी कोसळत होत्‍या.

कापणीची कामे ठप्‍प

मागील काही दिवसांपासून दररोज संध्‍याकाळी पाऊस बरसतो आहे. या पावसात कापणी केलेल्‍या भातपीकांचे नुकसान झाले आहे. आजच्‍या पावसाने पुन्‍हा कापलेले भातपीक भिजले आहे. आता हवामानखात्‍याच्‍या इशारयानंतर शेतकरयांनी कापणीची कामे थांबवली आहेत. आता शेतकरी पाऊस पूर्णपणे थांबण्‍याची आणि वातावरण निवळण्‍याची वाट पहात आहेत.

पर्यटकांचा हिरमोड

दिवाळीचा सण सुरू झाल्‍यापासूनच रायगड जिल्‍ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्‍थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका पर्यटन व्‍यवसायालाही बसला. पावसामुळे पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला. सुटीचा आनंद घेण्‍यासाठी आलेल्‍या पर्यटकांना आंनद घेताच आला नाही. पावसामुळे किनारयांवरील गर्दी कमी झाली होती. मुरूड जवळील जंजिरा किल्‍ल्‍यात जाण्‍यासाठी असणारी जलवाहतूक सेवा बंद करण्‍यात आल्‍याने पर्यटकांना निराश होवून परतावे लागले. पर्यटकांबरोबरच स्‍थानिक व्‍यावसायिकांमध्‍ये देखील नाराजीचा सुर होता.

जलवाहतूक बंद

जलप्रवासी वाहतूक बंद पडल्याने एसटी स्टँडवर झालेली गर्दी

खराब हवामानामुळे किनारयांवर तीन नंबरचा बावटा लावण्‍यात आला आहे. त्‍यामुळे गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा शनिवारी संध्‍याकाळपासूनच थांबवण्‍यात आली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. नियमित प्रवाशांबरोबरच पर्यटकांना याचा मनस्‍ताप सहन करावा लागला. त्‍यांना रस्‍ते मार्गे प्रवास करण्‍याची वेळ आली आहे.

वातावरणातील बदलामुळे समुद्र खवळलेला आहे त्‍यामुळे मच्‍छीमारांना धोक्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. मच्‍छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असे आवाहन रायगड जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

रायगड जिल्‍ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्‍यात आला आहे. त्‍यामुळे जिल्‍हयाच्‍या सर्वच भागात जोरदार वारे, वीजांचा कडकडाट आणि ढगांच्‍या गडगडाटासह पावसाची शक्‍यता आहे. नागरीकांनी सतर्क रहावे तसेच मच्‍छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, अशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. – सागर पाठक, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी.