अलिबाग – गणेशोत्‍सवासाठी आपल्‍या गावी निघालेल्‍या कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्‍हावा यासाठी रायगड पोलीसांनी कंबर कसली आहे. गणेशोत्‍सव काळात मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूकीचे नियोजन करण्‍यासाठी पहिल्‍यांदाच ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची हालचाल, गर्दीचे ठिकाण, कोंडी होण्याची शक्यता याचा अंदाज घेऊन त्वरित उपाययोजना करता येणार आहेत.

एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्‍यासाठी मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आणि खोपोलीकडून येणारया मार्गावर पाली या ठिकाणी ए आय कॅमेरे बसवण्‍यात आले आहेत. या कॅमेरांवर येणारया वाहनांची नोंद होईल. वाहनांची संख्‍या लक्षात घेवून वाहतूक कोंडीचा अंदाज घेता येणार आहे. त्‍यानुसार वाहतूक कोंडी होण्‍यापूर्वीच महामार्गावर नागोठणे किंवा कोलाड येथून वाहतूक वळवण्‍यात येईल.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकरांनी कोकणाकडे कुच केली आहे. रविवार सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. प्रवासात गणेश भक्तांना त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिस महामार्गावर उतरले असून वाहतुकीचं नियोजन करीत आहेत

मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना माणगावमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास अधिक होऊ नये यासाठी माणगाव पोलिस सज्ज झाले आहेत. या ठिकाणी रस्‍त्‍याच्‍या मध्‍ये दुभाजक टाकण्‍यात आले आहेत. त्‍यात कोकणाकडे जाणारया लेनवर दोन वाहने जातील एवढी जागा ठेवण्‍यात आली आहे. वाहतूकीचे नियंत्रण करण्‍यासाठी 15 पोलिस अधिकारी, 120 कर्मचारी, 30 वाहतूक कर्मचारी, 30 होमगार्ड आणि 30 आपदा मित्र अशी मोठी पथके माणगावमध्ये तैनात करण्यात आली आहेत तर या व्यतिरिक्त क्रेन, रूग्‍णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.

यावेळी गणेशोत्‍सव काळात वाहतूक कोंडी टाळण्‍यासाठी पहिल्‍यांदाच ए आय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे येणारया वाहनांची नोंद होणार आहे. वाहनांची संख्‍या लक्षात घेवून वाहतूकीचे नियोजन केले जाईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल. कोकणात येणारया गणेश भक्‍तांचा प्रवास सुखकर व्‍हावा यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत. – अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा