Maharashtra Weather Update : देशभरात दिवाळी मोठ्या उत्सहात साजरा केली जात आहे. आकाश कंदील, रांगोळी व रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात दिवाळी साजरा होत असतानाच मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची पावसामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज (२२ ऑक्टोबर) पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्या ठिकाणी विजांसह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश असणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे वारे वाहत असल्याच्या कारणास्तव राज्यात हवामान अस्थिर आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण राज्यातील काही ठिकाणी अचानक वादळ किंवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

मुंबईतही पावसाचा इशारा

मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं. पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही अशीच परिस्थिती असणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कोकण पट्ट्यातील मच्छिमार आणि किनारी रहिवाशांना जोरदार वारे वाहत असताना समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रवाशांना प्रवास करताना काळजी घेण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. तसेच २२ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान येलो अलर्ट कायम राहणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.