महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित औरंगाबाद सभेसाठी मनसेनं तयारी सुरु केली असून मनसेचे अनेक नेते आज औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. मात्र असं असलं तरी अद्याप या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असं असतानाच आज आज बुधवारी औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यासंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलंय. त्याचवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्याचं पहायला मिळालं.

पोलीस आयुक्त काय म्हणाले…
“एक मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या सभेचे औरंगाबाद जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असून या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून परवानगी मागितली आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्यावतीने सदरील मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यायची किंवा नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल,” असं निखील गुप्ता म्हणालेत.

नांदगावकरांनी घेतली आयुक्तांची भेट
दरम्यान, आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेतली. उद्यापर्यंत पोलीस आयुक्त राज ठाकरे यांच्या सभेत संदर्भात निर्णय घेणार असल्याचं नांदगावकर यांनी स्पष्ट केलंय. राज यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बाळा नांदगावकर हे आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आलेत. त्यांनी आज सायंकाळी पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची राज ठाकरे यांच्या सभेच्या परवानगी संदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली. यावेळी गुप्ता यांनी नांदगावकर यांना, “आम्ही उद्यापर्यंत (२८ एप्रिलपर्यंत) राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेऊ,” असं आश्वासन दिलं आहे.

नांदगावकरांनी केला शरद पवारांचा उल्लेख
गुप्ता यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदगावकर यांनी शरद पवारांच्या सभेला परवानगी देण्यात आली त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या सभेलाही परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केलाय. “आता पवारसाहेबांचीही सभा झाली ना कोल्हापूरला,” असं म्हणत नांदगावकरांनी पवारांच्या सभेला परवानगी देण्यात आली तशी परवानगी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना पोलिसांकडून ज्या काही सूचना असतील त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची असून आम्ही त्याचं पालन करु असं मी पोलिसांना सांगितल्याचंही, नांदगावकर म्हणाले.

गृहमंत्र्यांचा इशारा
“राज्यातील शांतता बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करु नका. नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सगळ्यांना आपल्या पुढे जाता येईल. पण राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सरकार हे सहन करणार नाही. राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय औरंगाबदचे पोलीस आयुक्त घेतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ते परवानगी देतील,” असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.