Devendra Fadnavis on Raj Thackeray with Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. निवडणुकीआधी राज ठाकरे महायुतीमध्ये सगभागी होतील अशी जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. मात्र, शेवटी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला. एवढंच नव्हे, तर त्यांनी खुद्द त्यांच्या मुलासह एकूण १२८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे आता मनसेच्या कामगिरीचं विश्लेषण राजकीय विश्लेषक करत असताना देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या स्वतंत्र लढण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीआधी अनेकदा बोलताना महायुतीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. किंबहुना निकालांनंतर आपल्याच पाठिंब्यावर महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केला होता. मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल, या चर्चेला त्यांनी स्वतंत्र लढण्याच्या निर्णयाने पूर्णविराम देत १२८ ठिकाणी उमेदवार दिले. खुद्द त्यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नसला, तरी त्यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतं मिळवल्याचं पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय का घेतला? याबाबत भाष्य केलं आहे. यासाठी जागांचं समीकरण कारणीभूत ठरल्याचं कारण फडणवीसांच्या विधानावरून पुढे येत आहे. “राज ठाकरेंनी लोकसभेला आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. आम्हाला त्याचा फायदा देखील झाला. पण विधानसभेत आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? कारण आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”

महापालिकेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी!

दरम्यान, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्यास तयार असल्याचं विधान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले. पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत. मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे आता विधानसभा निवडणुकांप्रमाणेच मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महायुतीत जाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.