राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त | raj thackeray konkan visit workers unaware about meeting sindhudurga mns committee dismissed rmm 97 | Loksatta

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त

कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
संग्रहित फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. पण कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दौऱ्याची माहिती ८ ते १० दिवस आधीच देण्यात आली होती, तरीही बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीचा थांगपत्ता नव्हता. अनेकांना या बैठकीची माहिती आज सकाळी कळाली. यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे या बैठकीला गैरहजर राहिले.

या घटनाक्रमानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, “एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये अनास्था दिसत आहे. या हॉलमध्ये आज राज ठाकरेंची सभा आहे, हे कार्यकर्त्यांना आज कळालं आहे. विशेष म्हणजे हा दौरा पूर्वनियोजित असून ८ ते १० दिवस आधीच दौऱ्याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली होती. तरीही कार्यकर्त्यांना याबाबत गांभीर्य नसेल तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारी उर्मी आम्हाला दिसून येते,” अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली.

हेही वाचा-VIDEO: “हिंदू लोक बेकायदेशीर बायका ठेवतात अन्…” मुलींच्या लग्नाबाबत बद्रुद्दीन अजमल यांचं विधान; म्हणाले, “मुस्लिमांचा हा फॉर्म्युला…”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची कार्यकारणी बरखास्त केल्याची माहिती देताना नांदगावकर पुढे म्हणाले, “आम्ही आज देवगड, कणकवली आणि वैभववाडीची कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीची माहिती राज ठाकरेंना दिली. त्यानंतर राज ठाकरेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी बरखास्त केली. यानंतर मुंबईत वेगवेगळ्या पदावर काम करणारे १०० कार्यकर्ते याठिकाणी आले आहेत. त्या सर्वांवर राज ठाकरेंनी जबाबदारी दिली आहे. या कार्यकर्त्यांच्या मदतीने पुढील दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कार्यकारिणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.”

हेही वाचा- VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

“स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेला मतभेद आमच्यासाठी काही प्रमाणात घातक ठरत आहे. ते निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. आणखी खूप महिला-पुरुष आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी असली तरी राज ठाकरे आपला कोकण दौरा पूर्ण करणार आहेत” असंही नांदगावकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 21:38 IST
Next Story
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन