Raj Thackeray on Devendra Fadnavis and Hindi Impostion : प्राथमिक शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि इतर कोणालाही जमलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.”
राज ठाकरे म्हणाले, “आज (५ जुलै) नियोजित केलेला मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र सर्वांनी पाहिलं असतं, मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच सरकारला माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) मैदानात व्हायला हवा होता. ते मैदान ओसंडून वाहिलं असतं. मात्र, पाऊस असल्यामुळे अशा जागा कार्यक्रमासाठी घेता येत नाहीत. हे सभागृह अपुरं आहे, त्यामुळे हजारो लोक बाहेर उभे आहेत. त्यामुळे मी बाहेर उभ्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांना आत येता आलं नाही.”
“आम्हा दोघांना एकत्र आणणं केवळ देवेंद्र फडणवीसांना जमलं”
राज ठाकरे म्हणाले, “मी मागे माझ्या मुलाखतीत म्हटलं की कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा माझ्यासाठी महाराष्ट्र व मराठी माणूस मोठा आहे. त्या वक्तव्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, एक गोष्ट खरी, जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, राज्यातील कुठल्याही नेत्याला, व्यक्तीला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. आम्हा दोघांना एकत्र आणणं फडणवीसांना जमलं.”
(बातमी अपडेट होत आहे)