मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंंभीर आरोप केले आहेत. तसंच मतदार याद्यांचे घोळ संपत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच जे काही विकास म्हणून चाललं आहे ते तुमच्यासाठी नाही, जमिनी विकत घेणाऱ्यांसाठी चाललं आहे असंही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र, महाराष्ट्रातली शहरंं अदाणी आणि अंबानींना आंदण द्यायची आहेत-राज ठाकरे
केंद्रातही आम्हीच पाहिजे, राज्यातही आम्हीच पाहिजे, जिल्हा परिषदेत आम्हीच पाहिजे. महाराष्ट्र, महाराष्ट्रातली शहरं ही अदाणी आणि अंबानींना आंदण द्यायची आहेत. मी मीरा भाईंदरच्या सभेतही काय चाललंय ते बोललो होतो. ठाणे जिल्हा हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही त्यामुळे सगळं काय चाललं आहे बघा. या ठिकाणी कोण राहतं आहे, गुजराती लोक राहात आहेत. वाढवण बंदर येतं आहे, नवं विमानतळ करत आहेत, कुणासाठी कशासाठी?
मला कळलेला प्लान असा आहे की…
मला यांचा कळलेला प्लान आहे तो लक्षात ठेवा. सगळे सत्ताधारी नाही होऊन पडतील पण काय बोलतो आहे ते लक्षात ठेवा. नवीन विमानतळ केलं आहे, ते आत्ताचं जे विमानतळ आहे ते अदाणींच्या हाती आहे. इथून सगळा कार्गो काढून वाढवणला नेणार, नवी मुंबईला वाहतूक हळूहळू नेणार. त्यानंतर मुंबई विमानतळाची जमीन अदाणींच्या घशात घालणार. भाजपाला मतदारन करणारे जे मराठी लोक आहेत त्यांनाही मला सांगायचं की अदाणी, अंबानींचा आणि गुजरातचा वरंवटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हालाही ते वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेतील. सगळ्या गोष्टींमध्ये अदाणी. शस्त्रं बनवायची आहेत, वीज बनवायची आहेत, टनेल बनवायचा आहे, रस्ता बनवायचा आहे अदाणी, सगळं काही अदाणी. ठाण्यात एक जागा आहे तिथे आता जंगल तोडणार आहेत, तिथे अदाणीला पॉवर प्रोजेक्ट काढायचा आहे. तिथल्या आदिवासी वगैरे लोकांना हटवणार आणि प्रकल्प सुरु करणार. जे काही रस्ते वगैरे होत आहेत ना.. ते पण त्यासाठीच. मुंबई, ठाण्यात होणारी प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल तर ते मी खपवून घेणार नाही.
रस्ते होत आहेत, विकास होतो आहे तो उद्योजकांसाठीच-राज ठाकरे
रस्ते होत आहेत, विकास होतोय वाटत असेल तर ते तुमच्यासाठी नाही. जे उद्योजक जमिनी विकत घेत आहेत त्यांच्यासाठी आहे. जिथे नजर पडेल ते पाहिजे आहे त्यांना. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमची मराठी माणसं दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करत आहेत. केंद्र, राज्यं आहेच यांच्या हातात. महापालिका आणि जिल्हा परिषदा आल्या तर रानच मोकळं होईल. जे काही चाललं आहे ते सहज चाललेलं नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्ही मुंबई गुजरातला हवी होती. सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आचार्य अत्रेंची पुस्तकं वाचा म्हणजे तेव्हा तुम्हाला समजेल की याला पहिला विरोध कुणी केला होता. हे सगळं आत्ताचं नाही, हे सगळं जुनंच आहे. त्यासाठीच बोगस मतदार भरले जात आहेत. सगळं काही एकदा हातात आलं की तुम्ही नंतर काय करणार? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
मतदारांनो सतर्क राहा, राज ठाकरेंचं आवाहन
जमीन एकदा हातातून गेली की ती परत येत नाही. जमीन हेच तुमचं अस्तित्त्व आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क राहा. यादी प्रमुखांना मी बोलवलं आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचे लोक येतील आणि इतर पक्षांचे लोक येतील त्यांना सहकार्य करा. एक एक घरात आठशे माणसं, सातशे माणसं भरली जात आहेत. जे मतदार नाहीत त्यांची खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत. हे जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सगळ्या पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. महाराष्ट्रातल्या निवडणुका सन्मानाने आणि शांततेत पार पाडायच्या असतील तर याद्यांचा घोळ मिटवा. जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टीकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले.